भाजपात जाणार का ? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले की….!


Will you go to BJP ? Ajit Pawar clearly said that….! मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात प्रवेश करीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार सुमारे 15 आमदार सोबत घेवून जाणार असल्याच्या चर्चाही होत आहे. अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्तही प्रकाशित झाल्यानंतर या बातमीवर पवारांनीच खुलासा देत कुठलीही बैठक बोलावले नसल्याचे स्पष्ट केले आहे.


मी मुंबईतच : अजित पवार
अजित पवार म्हणाले, खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे.

तर अजित पवार नॉट रिचेबल होतील
आमदार रवी राणा म्हणाले की, शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अजित पवार भाजपामध्ये येतील मात्र तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा हिरवा कंदील मिळेल व त्यानंतर पवार नॉट रीचेबल होतील, असेही राणा म्हणाले आहेत.

कुठलीही बैठक बोलावली नाही
अजित पवार म्हणाले की, मी विधान भवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार आहे. तेथे कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असा खुलासा अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी हा भाजपासाठी पर्याय : आमदार माणिकराव कोकाटे
राज्यातील राजकारण अत्यंत अस्थिर असून विरोधी पक्षातील नेतेही अस्थिर असल्याचं माणिकराव कोकाटे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. भाजपाला अपेक्षित यश मिळत नाही त्यामुळं राष्ट्रवादी हा भाजपसाठी पर्याय असणार आहे. राष्ट्रवादीला सोबत घेणे एवढा एकच पर्याय सध्या भाजपकडे आहे, असं कोकाटे म्हणाले. भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला फायदा होईल की नाही हे माहित नाही मात्र भाजपला याचा फायदा होईल असं वक्तव्य नाशिक मधील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले.

अजित पवार भाजपसोबत गेल्यास आम्ही त्यांच्यासोबत
भाजपसोबत जाण्यासंदर्भात दादांच्या बोलण्या वागण्यातून काहीही तसेच जाणवलं नाही. आता आमचे आमदार अस्वस्थ आहेत हे नक्की आहे. अजितदादा भाजप सोबत जाणार असतील तर आम्ही पक्षासोबत आणि दादांसोबत जाणार असं कोकाटे म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !