राज्य मंडळाच्या शाळा या तारखेनंतर होणार सुरू : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती


State board schools will open after this date: Education Minister Deepak Kesarkar informed मुंबई : राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील, असेही ते म्हणाले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परीषदेत माहिती दिली.

नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यात
मंत्री केसरकर म्हणाले, शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यावर्षी देखील मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा 26 एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यावर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि सॉक्स हे शासनातर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल, असा विश्वास श्री.केसरकर यांनी व्यक्त केला.

आजी-आजोबा दिवस साजरा होणार
येत्या वर्षापासून शाळांमध्ये ‘आजी आजोबा दिवस‘ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील अघोषित व घोषित विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा तसेच त्रृटी पूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांच्या नैसर्गिक तुकड्यांना सरसकट 20 टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. शिक्षक व सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली असून शिष्यवृत्तीच्या रकमेतदेखील मोठी वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !