आमदार अपात्र झाले तरी सरकार कोसळणार नाही : छगन भुजबळ
Chief Minister can change but government is not in danger : Chhagan Bhujbal claims नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यात मुख्यमंत्री बदलू शकतात मात्र सरकार कोसळणार नसल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरू आहेत, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केल्यानंतर भुजबळांनी हा दावा फेटाळला. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालावर हे सर्व अवलंबून आहे. 16 आमदार अपात्र झाले तरी त्यांना 149 आमदारांची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या 165 आमदार आहे. त्यामुळे सरकार त्यांचेच राहील, मुख्यमंत्री बदलू शकतात. मात्र, सरकारला धोका नाही.
या जर-तरच्या गोष्टी
छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले, 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल गेलाच तर शिंदे साहेब त्यात आहेत. ते मुख्यमंत्रीपदावरून गेले तर दुसरा मुख्यमंत्री येईल. पण या जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. जर समजा तसा निकाल आलाच तर मुख्यमंत्रीपद गेले तरी सरकारला 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 गेले तरी 149 आमदार शिल्लक राहतात. सरकार त्यांचेच राहील.

