जमिनीचा मोबदला न मिळाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर आत्मदहन

चाळीसगाव तालुक्यातील धरणग्रस्त शेतकर्‍यांचा इशारा : मन वळवत जमिनी घेतल्या ताब्यात


चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा-मुंदखेडा येथील धरणग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनी सरकारने कवडीमोल भावाने खरेदी केल्या आहेत. याचा योग्य मोबदला सरकारने येत्या पाच दिवसांत द्यावा अन्यथा 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी मुंबई येथील आझाद मैदानावर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा या परीसरातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

कवडीमोल भावाने जमीन खरेदी
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडे-मुंदखेडा येथे धरण उभारणीसाठी शासनाने शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. 2005 मध्ये या सर्वजमिनी देण्यासाठी शेतकरी तयार नव्हता परंतू त्या वेळच्या बाजार भावापेक्षा 10 पट रक्कम जमिनीच्या किंमती देवू असे सांगितले गेले. व परीसरातील शेतकर्‍यांचा धरण बांधल्यावर पाण्याची उपलब्धता होणार आहेआणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, असे सांगून शेतकर्‍यांचे मन वळवून जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. त्यावेळी सुरूवातीला शासनाने अतिरीक्तच्या नावाखाली शेतकर्‍यांनाएक लाख रुपये दिले. त्यानंतर वारंवार तक्रारी निवेदन देवून पैसे मिळत नसल्याने सर्व शेतकर्‍यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला. त्यावेळी न्यायालयाने शेतकर्‍यांना मोबदला मंजूर करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याचे सांगून अधिकारी टाळाटाळ करण्यात आली. अधिकार्‍यांनी सुमारे चार वर्ष हैराण केले. मध्यंतरी जळगाव जिल्हा न्यायालयात मुख्य न्या.सानप यांनी लोकअदालतीत तडजोडी अभियानात अधिकारी आणि शेतकरी यांच्यात समेट घडवून आणला. त्यानंतर अधिकार्‍यांनी प्रकल्पग्रस्तांना पहिला हप्ता दिला. त्यानंतर पुन्हा तीच बोंब सुरू झाली.

तर आंदोलनाचा इशारा
येत्या चार-पाच दिवसांत सरकारने शेतकर्‍यांच्या खात्यावर मोबदला वर्ग करावा असे न केल्यास 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी मुंबई येथील आझाद मैदानावर पिडीत शेतकरी आत्मदहन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर सुभाष पाटील, जितेंद्र येवले, भागाबाई रामचंद भोई, विनोद नारायण पाटील, प्रभाकर कौतीक पवार, रामकृष्ण दगडू शिंपी आदींच्या स्वाक्षर्‍र्‍या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !