भुसावळ बाजार समितीसाठी 98 टक्के मतदान
खाचणे हॉलमध्ये आज मतमोजणी : नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : वाहनातून मतदानस्थळी प्रकटले मतदार
Reputation of leaders at stake in Bhusawal : Result of Kuruba election tomorrow भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी शुक्रवारी सकाळी आठ ते चार या वेळेत शहरातील जामनेर रोडवरील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 18 जागांसाठी 38 उमेदवार रींगणात होते तर 560 पैकी 552 (98.57) मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी एकत्र येत भुसावळातील भाजपाचे स्थानिक आमदार संजय सावकारे यांच्याविरोधात लढा दिला. ‘शेतकरी विकास’ या अजेंड्यावर लढण्यात आलेल्या निवडणुकीत मतदार नेमका कुणाला कौल देणार? हे शनिवारी मतमोजणी अंती स्पष्ट होणार आहे.
पहिल्या चार तासात 63 टक्के मतदान
भुसावळ तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समिती निवडणुकीत 560 पैकी 552 मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी आठ ते दहा या वेळेत 43 टक्के तर नंतरच्या दोन तासात 63 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विकासो मतदारसंघात 12.30 वाजेपर्यंत 98 टक्के मतदान झाले. 168 एकूण मतदारांपैकी दोन मतदार मयत असून 166 मतदारांनी 12.30 वाजेपर्यंत आपला हक्क बजावला तर ग्रामपंचायत मतदारसंघातील 226 मतदारांपैकी 159 तसेच व्यापारी मतदारसंघातील 117 पैकी 99 तर हमाल-मापाडी मतदारसंघातील 49 मतदारांपैकी 45 मतदारांनी दुपारी 12 वाजेपर्यंत आपला हक्क बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

भुसावळात 98.57 टक्के मतदान
भुसावळ कृउबासाठी विविध कार्यकारी संस्था गटातून 168 पैकी 166 मतदारांनी तर ग्रामपंचायत मतदारसंघातील 226 पैकी 223 मतदारांनी हक्क बजावला. व्यापारी गटातील 117 पैकी 115 तर हमाल मापाडी गटातील 49 पैकी 48 मतदारांनी आपला हक्क बजावला. एकूण 98.57 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकार्यांनी दिली.
चार बुथवर मतदान
जामनेर रोडवरील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात चार बुथमध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. एका केंद्रावर साधारण चार सहकार अधिकारी व दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले. केंद्राबाहेर व आत स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदार यादीत नाव तपासल्यानंतर मतदारात बुथमध्ये सोडण्यात आले तर यंदा प्रथमच मतदारसंघात दोन वेळा नावे असल्यानंतरही मतदानाची मुभा असल्याने मतदारांनी त्या अनुषंगानेही दोन वेळा मतदान केले. अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या बाहेर बॅरीकेटस लावून चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली.
आज होणार मतमोजणी
कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शनिवार, 29 रोजी शहरातील डॉ.बी.व्ही.खाचणे हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल तर चार तासात निकाल लागण्याची शक्यता आहे. सहा टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया होणार असून सहा सहकार अधिकारी व सहा कर्मचारी यावेळी नियुक्त असतील. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी प्रशांत वीरकर व सहा.निवडणूक अधिकारी अयुब तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.
