भुसावळ शहर बुडाले अंधारात : 43 तासानंतर शहरात वीजपुरवठा

अवकाळी वादळाने सत्तरहून अधिक झाडे उन्मळली, पोलही कोसळले : पाण्यासाठी नागरीकांचे हाल : सोमवार सायंकाळपर्यंत वीजपुरवठा होणार सुरळीत


Bhusawal city plunged into darkness: Power supply in the city after 43 hours भुसावळ : शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले असतानाच शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळल्याने तसेच वीज पोल तुटल्याने शहराचा वीजपुरवठा शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून ठप्प झाल्यानंतर तो सोमवारी दुपारी 12 वाजता सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले. वीज गुल झाल्याने शहराचा पाणीपुरवठा प्रभावीत झाला असून पाण्यासाठी नागरीकांची भटकंती सुरू झाली आहे. विहिरींसह हातपंपावर नागरीकांची गर्दी वाढली असून शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळाने शहरात लाखोंचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

भुसावळ शहर बुडाले अंधारात
शनिवारच्या अवकाळी पावसामुळे वीज तारा तुटल्याने तसेच वीज तारांवर वृक्ष उन्मळून पडल्याने शहराचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. 24 तासानंतरही शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, 80 हून अधिक ठिकाणी महावितरणाच्या वीज तारा तुटल्या आहेत तर 35 ते 40 वीज पोल वाकले आहेत शिवाय तीन ट्रान्सफार्मर जळाल्याने युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. महावितरणचे 50 व तीन ठेकेदाराचे 35 कर्मचारी शनिवारी रात्री उशिरापासून सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी झटत आहेत. शहरात वादळामुळे महावितरणचे अधिक प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी बिघाड झाल्यानंतर वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल, हे आत्ताच सांगणे अशक्य असल्याचे कार्यकारी अभियंता पी.आर.घोरूडे यांनी ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

काही भागात वीज येताच झाली गुल
रविवारी शहरातील उत्तर भागातील न्यायायल फिडर व सतारे फिडरवरील काही भाग तसेच दक्षिण भागातील इदगाह फिडर, वरणगावरोड फिडर, नाहाटा, प्रेरणानगर या फिडरवर शनिवारी रात्री वीजपुरवठा सुरळीत झाला मात्र वीज येताच पुन्हा गुल झाल्याचे नागरीकांनी सांगितले. सलग 24 तासाहून अधिक काळापासून शहरात वीज गुल झाल्याने नागरीकांचे अतोनात हाल होत असून व्यापार्‍यांना मोठा फटका बसला आहे तर विजेवर चालणार्‍या उद्योगांनाही आर्थिक नुकसानीला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे.

तीन दिवस पुढे ढकलला पाणीपुरवठा
शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पाणीपुरवठा विस्कळीत झाला तर शनिवारी पुन्हा दुपारी चार वाजता पाण्याची उचल सुरू असतानाच सायंकाळी पाच वाजता अवकाळी वादळाने वीज गुल झाली तर अनेक ठिकाणी वीज पोल उन्मळल्याने तसेच वीज वाहक तारा तुटल्याने शहराचा वीजपुरवठा 24 तासानंतरही सुरळीत झालेला नाही तर आणखी 24 तास अर्थात सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरू होणार नसल्याची भीती आहे. यंत्रणा युद्ध पातळीवर काम करीत असलीतरी अनेक ठिकाणी बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. शहरातील रोटेशनप्रमाणे होणार पाणी पुरवठा आता तीन दिवस पुढे ढकलला आहे. भुसावळकरांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख यांनी केला आहे. शहरातील पाणीपुरवठा आता तीन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

वृक्ष उन्मळले तर पोल तुटल्याने वीजपुरवठा ठप्प
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील दत्तधाम कॉलनी समोर हायमास्ट लॅम्प तुटल्यानंतर अन्य दुसरा पोल वाकला तर वृक्ष जामनेर रोडवर वाहतूकीच्या रस्त्यावर पडल्याने वाहतूकीवर याचा परीणाम झाला. वांजोळा रोडवरील तुळशी नगरमध्ये श्रीकृष्ण मंदीराच्या पुढे प्राची अपार्टमेंट जवळ बदामाचे झाड अर्ध्यातून तुटून वाहतूकीच्या रस्त्यावर पडले यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली. टिंबर मार्केट परीसरात सुध्दा झाडे उन्मळून पडली. न्यु एरिया वॉर्ड भागात सुध्दा वादळाने नुकसान झाले. यावल रोडवरील बलवंतसिंग पटेल यांच्या गॅरेजवर सुध्दा झाड कोसळले. आरपीडी रोड सुध्दा मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्याने वाहतूक बंद होती. गार्ड लाईनजवळ रस्त्यावर झाड पडल्याने रेल्वेच्या परिसरातील मार्ग वाहतूकीला बंद झाल्याने शिवाजी नगर भागातून ये-जा सुरू केली. लोखंडी पूलाजवळ संदीप देवडा यांच्या दुकानाजवळ विजेची तार तुटली होती, ती वाहतूकीच्या रस्त्यात लोंबकळत होती, तर दुकानाच्या मागील मोठा वृक्षही उन्मळला. लोखंडी बोगद्यात सुमारे दोन ते तीन फूट पाणी साचले होते. यामुळे नागरीक लहान बोगद्यातून वापरत होते. बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातील सुध्दा मोठे झाड वादळात कोसळले आहे. सुर्देवाने तेथे कोणीही नसल्याने दुर्घटना टळली. शहरातील रेस्ट हाऊसजवळ झाड तुटल्यानंतर वीज पोलही तुटल्याने रात्री उशिरापर्यंत यंत्रणेकडून दुरुस्तीसाठी धावपळ सुरू होती. के.नारखेडे इंग्लीश मिडीयम स्कूलजवळ झाड कोसळले. खडकारोड, जाम मोहल्ला, सिंधी कॉलनी, स्ट्रार लॉन, जामनेर रोडवरील तलाठी कार्यालय येथे झाडे पडली, तसेच जाम मोहल्ला भागात सुध्दा घरांवरील पत्रे उडाली आहे. सहकार नगरमध्ये झाड पडले. हनुमान नगरात तीन ते चार जुनी झाडे पडली. तर सिंधी कॉलनीत छतावर लावलेले सोलर उडून गेले. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

स्टेशनवर छत उडाले तर घरही कोसळले
शनिवारी गार्ड लाईनजवळ झाड कोसळल्याने उभ्या असलेल्या तीन रीक्षा झाडाखाली दाबल्या गेल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. स्टेशन पोलीस चौकीवरही झाड पडल्याने चौकीचे नुकसान झाले आहे. वादळी पाऊस व गारपीटीमुळे शहरातील गवळी वाड्यातील खाटीक नामक व्यक्तीचे घरही पडले, त्यात संसारोपयोगी वस्तू दाबल्या गेल्यात. वादळी वार्‍यात रेल्वे स्थानकावरील जनरल तिकीट खिडकीच्या वर लावण्यात आलेले फायबरच्या पत्राचे छत उडाले. यामुळे थेट पावसाचे पाणी हे स्टेशनच्या परीसरात पडल्याने धावपळ उडाली.

पालिका पथकाकडून उपाययोजना
शहरात वादळी वार्‍यामुळे व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभुमीवर पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचार्‍यांसह 80 कर्मचार्‍यांच्या पथकाने रात्रीतून रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत केली. यासाठी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे स्वता: रात्री दोन वाजेपर्यंत मदतकार्यासाठी रस्त्यावर होते. आरोग्य अधिकारी प्रदीप पवार, आरोग्य निरीक्षक व्ही.सी.राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबीच्या सहायाने रस्ते मोकळे करणे, रस्त्यात पडलेली झाडे कापण्याचे काम करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !