पूरग्रस्तांना मोठा दिलासा ; पूर्णपणे नष्ट झालेली घरे राज्य सरकार बांधणार
मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात मोठी पडझड झालेली आणि पूर्णत: नष्ट झालेली घरे राज्य सरकार बांधून देणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठीचे निर्णय तातडीने घेता यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. आठवड्यातून किमान एकदा या उपसमितीची बैठक होईल. केंद्राची मदत प्राप्त होईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यातील नुकसानीपोटी केंद्राकडे मागितलेल्या पॅकेजमध्ये आपदग्रस्तांच्या कुटुंबीयांसाठी 300 कोटी, मदतकायार्साठी 25 कोटी, तात्पुरत्या निवारा केंद्रांतील नागरीकांसाठी 27 कोटी, स्वच्छतेसाठी 70 कोटी, पीक नुकसानीपोटी 2088 कोटी, जनावरांच्या जीवितहानीपोटी 30 कोटी, मत्स्य व्यवसायिकांसाठी 11 कोटी, घरे दुरुस्तीसाठी 222 कोटी, रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी 876 कोटी, सिंचन आणि जलसंपदा विभागाच्या कामांसाठी 168 कोटी, आरोग्यविषयक उपक्रमांसाठी 75 कोटी, शाळांच्या इमारती आणि पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी 125 कोटी, छोट्या व्यावसायिकांच्या नुकसानीपोटी 300 कोटी याप्रमाणे एकूण 4708.25 कोटी रु.ची मदत निश्चित करण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांना प्रथमच मदत प्रस्तावित करण्यात आली आहे. कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातही याच पद्धतीने 2105.67 कोटींची मदत केंद्राकडे मागितली जाणार आहे
मंत्र्यांना एका तालुक्याची जबाबदारी
पूरग्रस्त भागातील प्रत्येक तालुक्याची जबाबदारी एका मंत्र्यास दिली जाणार आहे. 15 ऑगस्टनंतर हे मंत्री तालुक्यांमध्ये जाऊन मदत व पुनर्वसन कामावर लक्ष देतील. पूरग्रस्तांसाठी आपला विभाग काय योगदान देऊ शकतो, याचा अहवाल तयार करून, त्या अनुषंगाने मंत्री कार्यवाही करतील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सहा हजार 813 कोटी खर्च होणर
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदत व पुनर्वसनासाठी 4 हजार 708 कोटी 25 लाख तर रुपये, तर कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी 2 हजार 105 कोटी 67 लाख असे एकूण 6 हजार 813 कोटी 92 लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.