राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारच !


Sharad Pawar as the president of NCP ! मुंबई : राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले गेले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अजित पवार यांच्याबरोबर भाजपात जाणार असल्यानेच शरद पवारांनी हा राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचाही दावा करण्यात आला मात्र शरद पवारांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्याने शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

साखर वाटून आनंदोत्सव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार हेच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समितीने याबाबतचा ठराव एकमताने मंजूर केल्यानंतर शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परीषद घेत निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

उत्तराधिकारी कोण : पवारांनी स्पष्टच सांगितले
तुमचा उत्तराधिकारी कोण असेल? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता पवार म्हणाले की, उत्तराधिकारी निर्माण करेन ही संकल्पना मी ठरवलेल्या गोष्टींपैकी नाही मात्र ही गोष्ट माझ्या मनात जरूर आहे की, संघटनेत काही नवीन सहकार्‍यांना आणून संधी दिली पाहिजे. याबाबत मी सहकार्‍यांशी चर्चा करेन. काही लोक 10-15 वर्षे जिल्हास्तरावर काम करतात आणि ते राज्य पातळीवरही काम करू शकतात ही क्षमता त्यांच्यात आहे हे आम्हाला माहिती आहे तसेच राज्य स्तरावर अनेक वर्षे काम करणारे लोक आहेत जे राष्ट्रीय पातळीवरही काम करू शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि माझ्या वरिष्ठ सहकार्‍यांची आहे. आम्ही ही जबाबदारी हळूहळू पार पाडणार आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.

पक्ष सोडण्याबाबत पवारांनी स्पष्टच सांगितले
माध्यम प्रतिनिधींनी अनेक आमदार एका मोठ्या नेत्याबरोबर दुसर्‍या पक्षात जाणार होते म्हणून राजीनामा दिला का? असा थेट प्रश्न पवारांना विचारला असता शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कोणताही पक्ष असू द्या, जर कुणाला पक्ष सोडून जायचं असेल, तर त्यांना कुणीही अडवत नाही. त्यासाठी पक्षाच्या नेत्याने स्वतः नरमाईची भूमिका घेण्याची गरज नाही. अशावेळी नेत्याने पुढे येऊन या परीस्थितीत बदल कसा घडू शकतो यावर लक्ष दिलं पाहिजे. इतकं तर मला कळतं. मात्र अशी स्थिती आमच्या पक्षात नाही, असे सांगायलाही पवार विसरले नाहीत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !