भुसावळात संविधान आर्मीतर्फे आज महावितरण कार्यालयावर मोर्चा

माजी नगरसेवक जगन सोनवणे यांची पत्रकार परीषदेत माहिती


भुसावळ : गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, शहरातील पाणीप्रश्न व विजेचा खोळंबा या प्रश्नी संविधान आर्मीसह दहा संघटनांतर्फे बुधवार, 10 मे रोजी दुपारी एक वाजता पंचायत समिती, तहसील व महावितरण कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांनी रविवारी शासकिय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परीषदेत ही माहिती दिली.

विविध मागण्यांसाठी मोर्चा
गत आठवड्यात भुसावळ ग्रामीण भागात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. शहरातदेखील अनेक नागरीकांचे नुकसान झाले आहे मात्र सात दिवस उलटूनही संबधीत विभागाने नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. सध्या पंचनाम्यांना उशीर होत असल्याने शेतकर्‍यांना प्रत्यक्षात भरपाई कधी मिळेल? असा प्रश्न आहे. यासोबतच शहर व तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक गावाला पाणीपुरवठा व्हावा, सध्या महावितरणकडून ग्राहकांना जादा बिले दिली जात आहेत. ग्राहकांच्या अधिक प्रमाणातील बिलांच्या तक्रारी सोडवल्या जात नाहीत. या सर्व प्रश्नी संविधान आर्मी, पीआरपी व 10 संघटनांच्या माध्यमातून बुधवारी दुपारी एक वाजता पंचायत समिती कार्यालय, दुपारी दोन वाजता तहसीलदार कार्यालय व दुपारी तीन वाजता तापी नगरातील महावितरण कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

यावल रोडपासून मोर्चाला सुरूवात
शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून या मोर्चाला सुरवात होईल. या मोर्चात दहा संघटनांसह शहर व तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संविधान आर्मी व पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे नेते जगन सोनवणे यांनी दिली. यावेळी माजी नगरसेविका पुष्पा सोनवणे, राकेश बग्गन, संघपाल किर्तीकर, ज्योती किर्तीकर, अशोक अटकाळे, शे.आतीक, लालखाँ तडवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !