शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र करणार का ? राहुल नार्वेकरांनी दिले हे उत्तर…!


मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षात झालेल्या पेचानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे गुरुवारी दिलेल्या निकालानंतर आता शिंदे गटातील आमदार अपात्र होणार का? या प्रश्नावर मंथन सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट, राज्यपाल यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले असलेतरी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  (Rahul Narvekar) आता काय निर्णय घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नार्वेकर हे सध्या लंडन दौर्‍यावर असून ते परतल्यानंतर यावर कार्यवाही करण्याची शक्यता आहे.

नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले….
आमदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो, हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नमूद केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. येत्या काळात यावर सुनावणी घेऊ. आम्ही याप्रकरणी लवकारत लवकर योग्य तो निर्णय घेऊ परंतु त्याआधी इतर कार्यवाही पूर्ण करावी लागेल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वांत आधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व नेमके कोण करते याचा निर्णय घ्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने तसे सांगितले आहे त्यामुळे सर्वांत आधी यावर निर्णय घेतला जाईल. यावेळी सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला जाईल. संसदीय लोकशाहीला बळकट करणारा निर्णय घेतला जाईल. योग्य वेळेत आमदारांच्या पात्रतेसंदर्भात निकाल दिला जाईल, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.

सर्व याचिकावर नार्वेकर घेणार सुनावणी
आमदारांच्या पात्रता-अपात्रतेआधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोण करत आहे. यावर निर्णय घेतला जाईल. यासाठी व्यवस्थित चौकशी केली जाईल. पक्षाची घटना काय म्हणतेय याचा विचार करून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नेमका किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सर्व याचिकांवर सुनावणी घेतली जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

 


कॉपी करू नका.