भुसावळात दोघा व्यापार्‍यांना फोनवरून खंडणी मागणारा संशयित राजा मोघेच !

दुसर्‍या आरोपीलाही पोलिसांनी घातल्या बेड्या : संशयितांना 20 पर्यंत पोलीस कोठडी


भुसावळ : राज्यात गाजलेल्या खरात हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी राजा मोघे यानेच शहरातील दोन व्यापार्‍यांना हस्तकांमार्फत पाठवून धमकावल्याची धक्कादायक माहिती अटकेतील एका आरोपीच्या कबुली जवाबातून समोर आली आल्याने शहरातील व्यापारीवर्गात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे संशयित पाच जणांच्या हत्याकांडानंतर राजा मोघे हा नाशिक कारागृहात आहे. मंगळवार, 16 मे रोजी संशयितांची न्यायालयीन तारखेवर सुनावणी असल्याने प्रचंड बंदोबस्तात पाच संशयितांना भुसावळ सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. दुपारी 1.20 ते दोन वाजेदरम्यान दोन पंटरांनी राजा मोघे याच्याशी संपर्क साधून दोन व्यापार्‍यांना 10 व 20 हजारांची खंडणी मागितल्याने शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, राजा मोघे यानेच व्यापार्‍यांशी धमकावून संभाषण केल्याचे समोर आल्यानंतर संशयितांना नाशिकहून आणणार्‍या पोलिसांवर आता निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

दुसर्‍या आरोपीच्या अटकेने समोर आला खरा प्रकार
भुसावळातील गुजराथी स्वीटचे संचालक कपिल मेहता व गोपी मॉलचे रवीकुमार झामनानी यांच्याकडे मंगळवारी दुपारी अनुक्रमे 10 व 20 हजारांची खंडणी राजा मोघेच्या नावाने आलेल्या पंटरांनी मागत धमकावले होते शिवाय खंडणी न दिल्यास गोळीबार करण्याची तसेच दुकान चालवणे कठीण होईल, अशी धमकीही दिली होती. या प्रकरणी शहर व बाजारपेठ पोलिसात सुरूवातीला राजा मोघे याचा भाऊ योगेश मोघे याला बुधवारी जळगाव गुन्हे शाखेने जळगावच्या खोटे नगरातून अटक करण्यात आली तर व्यापार्‍यांकडे खंडणी मागणार्‍या पंटरातील एक संशयित रीतीक उर्फ गोलू भगवान निदाने (22, नॉर्थ कॉलनी, भुसावळ) यास बुधवारी राहत्या घरातून अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गोलू निदाने याची चौकशी केल्यानंतर व्यापार्‍यांशी फोनवरून बोलणारा राजा मोघेच असल्याची कबुली आरोपी गोलूने दिल्याचे वाघचौरे यांनी ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

अटकेतील दोघा आरोपींना 20 पर्यंत पोलीस कोठडी
भुसावळातील व्यापार्‍यांना धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित योगेश उर्फ सोनू हिरालाल मोघे (28, रा. आगवाली चाळ, ह.मु. हिरावाडी, नाशिक) व रीतीक उर्फ गोलू भगवान निदाने (22, नॉर्थ कॉलनी, भुसावळ) यास भुसावळ सत्र न्यायालयात गुरुवारी हजर केले असता न्यायालयाने 20 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पघडण यांच्या नेतृत्वात सहाय्यक फौजदार मोहंमद अली सय्यद, सोपान पाटील, भूषण चौधरी यांनी नॉर्थ कॉलनीतून संशयित रीतीक निदानेच्या मुसक्या बांधल्या.

तर आरोपींना आणणार्‍या पोलिसांचे निलंबन !
मंगळवार, 16 मे रोजी भुसावळ सत्र न्यायालयात खरात हत्याकांडातील राजा मोघेसह चौघांना नाशिकच्या कारागृहातून तर एकाला जळगाव कारागृहातून बंदोबस्तात भुसावळ न्यायालयात आणण्यात आले मात्र दुपारी 1.20 ते दोन वाजेदरम्यान दोन व्यापार्‍यांना स्वतः राजा मोघे यानेच धमकावल्याची बाब तपासात समोर आल्याने आरोपींना भुसावळात आणणार्‍या पोलिसांवरही लवकरच कारवाई शक्य असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आरोपी राजा मोघे यास चारचाकी वाहनातून शहरात आणण्यात आल्याने निश्चितच रस्ते मार्गात कुठेतरी त्यास मोबाईल मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमक्या कुणाच्या मोबाईलवरून आरोपीने संभाषण केले? त्याला मोबाईल मिळू देण्यासाठी नेमका काय प्रकार घडला ? हे पोलीस तपासात लवकरच निष्पन्न होणार आहे. पोलिसांनीच आरोपी राजा मोघेला मोबाईल पुरवला असल्यास दोषी पोलिसांवर देखील निलंबनाची कारवाई होईल शिवाय गुन्हादेखील दाखल होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

खंडणीच्या तपासात पोलिसांपुढे ही आव्हाने
शहरातील व्यापार्‍यांना ओलीस ठेवून खंडणी मागणार्‍या दोघांपैकी एकाला पकडल्यानंतर त्याने व्यापार्‍यांना धमकावणारा राजा मोघेच असल्याची कबुली दिल्याने पोलिसांना आता राजा मोघे नेमका कुणाच्या मोबाईलवरून बोलला, नेमका कुठे हा प्रकार घडला? याचा तपास करावा लागेल शिवाय आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल जप्त करण्यासह दुचाकी जप्त करण्याचे आव्हानही असणार आहे. या गुन्ह्यात आरोपींना आणखी काहींनी मदत केली असल्यास या आरोपींचादेखील शोध घ्यावा लागणार असून याच व्यापार्‍यांना का टार्गेट करण्यात आले हादेखील तपासातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे. संवेदनशील प्रकरणातील आरोपींमुळे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असतील तर त्यांना व्हीसीद्वारेदेखील तारखेवर बोलावले जावू शकते, असाही मतप्रवाह आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेचा वेळेसह खर्चाचा अपव्ययदेखील थांबणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !