रोजंदारीचे पैसे घेण्यास गेलेल्या 28 वर्षीय तरुणाला चौघांची मारहाण करीत जातीवाचक शिविगाळ : साकळी गावातील घटना
A 28-year-old youth who had gone to collect his daily wages was beaten up by four casteists: incident in Sakli village यावल : तालुक्यातील साकळी येथील मरीमाता मंदिराच्या जवळ 28 वर्षीय तरूण रोजंदारीचे पैसे घेण्यासाठी त्याच्या मित्राकडे गेला असता मित्रासोबत भांडण करणार्या चौघांनी या 28 वर्षीय तरुणालाच बेदम मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी चार जणाविरुद्ध अॅट्रसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा
साकळी या गावातील 28 वर्षीय तरुणाने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तो रीक्षा चालवून रोजंदारीचे काम करतो. रोजंदारीचे पैसे घेण्यासाठी तो साकळी गावातील त्याचा मित्र सुधाकर बडगुजर यांच्याकडे गेला असता सुधाकर बडगुजर हा मरीमाता मंदिराच्या जवळ उभा होता व त्याच्यासोबत चार जण भांडण करीत होते. पैसे मागण्यासाठी गेलेल्या या तरुणाला पाहून कृष्णा एकनाथ माळी, मंगलाबाई एकनाथ माळी, पांडुरंग एकनाथ माळी व एकनाथ शामराव माळी (सर्व राहणार साकळी) या चौघांनी त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. सुधाकर बडगुजरला सांगितले की तू याच्या भरोसे मातला आहे का? असे सांगून 28 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. यात हा तरूण जखमी झाला व त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध अॅट्रासिटीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे करीत आहे.
