पाच महिन्यांपूर्वी लग्न केलेली पत्नी आवडत नसल्याने घडले भुसावळात दोघांचे हत्याकांड
अमोल देवरे
भुसावळ : पाच महिन्यांपूर्वीच लग्न करून आणलेली पत्नी आवडत नसल्याने त्यातून रेल्वे कर्मचारी असलेल्या पतीचे सातत्याने खटके उडत होते व त्यातूनच मंगळवारी पहाटे दाम्पत्यात कडाक्याचे भांडण झाले व त्यात मध्यस्थी करणार्या आईचा व नंतर संतापात पत्नीचीदेखील आरोपी पतीने खून केला. या घटनेत दाम्पत्यातील मनमिटाव दूर करण्यासाठी आलेल्या शालकालादेखील गंभीर ईजा झाली आहे. भुसावळ शहरातील बालाजी लॉनमागील शगुन इस्टेटमध्ये मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास दोघांची हत्या झाली. या घटनेत आराध्या हेमंत भूषण (23) व सुशीलादेवी भूषण (63) यांचा मृत्यू झाला तर या प्रकरणी संशयित आरोपी तथा रेल्वे कर्मचारी हेमंत श्रवणकुमार भूषण यास अटक करण्यात आली आहे.
डोक्यात मारली धारदार वस्तू
संशयित हेमंत श्रवणकुमार भूषण हा भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. पत्नी आराध्या व आई सुशीलादेवी यांच्यासह तो वांजोळा रोड, बालाजी लॉजमागील शगुन इस्टेटमध्ये काही महिन्यांपूर्वीच वास्तव्यास आला होता. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असून पत्नी आवडत नसल्याने त्याचे मंगळवारी मध्यरात्री भांडण झाले व आईने वादात मध्यस्थी केल्याने त्याने 63 वर्षीय आईचा तसेच 24 वर्षीय पत्नीचा डोक्यात लोखंडी वस्तू मारून निर्घृण खून केला.
हल्ल्यात शालकदेखील जखमी
पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या आरोपी हेमंतला पत्नी आराध्या आवडत नसल्याने त्यांच्यात या ना त्या कारणावरून नेहमीच खटके उडत होते. दाम्पत्याला वाद मिटवण्यासाठी मुंबईतील उच्चशिक्षीत सॉप्टवेअर अभियंता तथा आरोपीचा शालक ऋषभ (26) हा सोमवारीच भुसावळात आला होता मात्र मंगळवारी पहाटे दाम्पत्यात कुठल्यातरी कारणावरून जोरदार कडाक्याचे भांडण झाले व आरोपीने संतापाच्या भरात लोखंडी वस्तूने आईसह पत्नीच्या डोक्यात मारल्याने दोघांचा अतिरक्तस्त्राव होवून मृत्यू झाला तर ऋषभ हा देखील जखमी झाला. ऋषभने हा प्रकार स्थानिक बाजारपेठ पोलिसांना कळवला.
पोलीस अधिकार्यांची धाव
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व बाजारपेठ कर्मचारी घटनास्थळी दाखल असून त्यांच्याकडून खुनाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
(ही बातमी दिवसभरात आम्ही अपडेट करू, रीफे्रश करत रहा)
