भुसावळातील माध्यमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत ‘अपक्षांचा’ वरचष्मा ; सहकार पॅनलला केवळ सहा जागा

परीवर्तन पॅनलला एक तर सहकारचा सहा जागांवर विजय : सहकार अपक्षांच्या मदतीने करणार सत्ता स्थापन


‘Independents’ prevail in Bhusawal’s secondary teacher credit election; Only six seats on the Co-operative Panel भुसावळ : भुसावळसह सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत आठ जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे तर सहकार पॅनलला सहा तर परीवर्तन पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किंगमेकर ठरले असून अपक्षांच्या मदतीने सहकार पॅनलला सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

तीन तासात हाती आले निकाल
जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड या सहा तालुक्यांची शिक्षकांची जळगाव जिल्हा पूर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढीची निवडणूक रविवार, 21 मे रोजी झाली. या निवडणुकीची एकत्रीत मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजता डॉ.बी.व्ही.खाचणे मंगल कार्यालयात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 15 जागांचे निकाल हाती आले तर मतदारांनी संमिश्र कौल देत सत्ता स्थापण करण्याच्या चाव्या अपक्षांच्या हाती सोपवल्या. यंदाच्या निवडणुकीत सहकार विरुध्द परीवर्तन या दोन्ही पॅनलमध्ये जोरदार लढत झाली असलीतरी अपक्षांनी मात्र या निवडणुकीत बाजी मारत दाव्यांवर पाणी फेरत आठ जागा पटकावल्या. सहकार पॅनलला सहा तर परीवर्तन पॅनलला एकमेव एक जागा मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक सहकार अधिकारी एस. डी.उचित, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक सहकार अधिकारी एम. डी. चौधरी, शासकीय प्रतवारीकार दीपक धनगर यांनी काम पाहिले. तसेच सुरक्षेसाठी उपनिरीक्षक शकील शेख, हवालदार श्रीकृष्ण पाटील, समीर तडवी, महेंद्र शिंपी, सुमन राठोड, प्रशांत सोनार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

असे आहेत निवडणुकीत विजयी उमेदवार
सर्वसाधारण जागा- रावेर तालुका- विनोद पाटील, अपक्ष (362), नरेंद्र कुमार दोडके, अपक्ष (238), मुक्ताईनगर तालुका- राजू लवांड, अपक्ष (159), जळगाव तालुका- गोपाळ महाजन, अपक्ष (202), तुळशीराम सोनवणे, परीवर्तन पॅनल (193), भुसावळ तालुका- गोपाळ पाटील, सहकार पॅनल (305), शैलेंद्रकुमार महाजनख अपक्ष (208), बोदवड तालुका- ज्ञानेश्वर मोघे, अपक्ष (64) यावल तालुका- अश्विनी कोळी, अपक्ष (253), चेतन तळेले, अपक्ष (188), महिला राखीव गटातून चेतना चौधरी, सहकार पॅनल (1450), निलीमा नेमाडे, सहकार पॅनल (1281), अनुसूचित जाती गटातून प्रशांत सोनवणे, सहकार पॅनल (1166), विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून अमितकुमार परखड, सहकार पॅनल (1283) व इतर मागास प्रवर्ग गटातून दीपक गुळवे सहकार पॅनल (1504).

सहकार पॅनलच्या सत्ता स्थापण्याच्या हालचाली
जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढीच्या निवडणूकीत कोणत्याही पॅनलला बहुमत मिळाले नसलेतरी अपक्षांची मदत घेवून सहकार पॅनल सत्ता स्थापन करणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी पॅनलच्या वरीष्ठांकडून नावे सुचवण्यात येतील. त्यानंतर पतपेढीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवपदी निवड होईल. यंदाच्या निवडणुकीत परीवर्तन पॅनलच्या निर्मितीमुळे एकही जागा बिनविरोध निघाली नाही, तर माघारीच्या दिवशी शेवटच्या सात मिनिटांमध्ये परीवर्तन पॅनल तयार झाल्यानंतर निवडणुकीत एक जागा का असेना या पॅनलला मिळाली आहे.

उच्चशिक्षित मतदारांकडून मते बद झाल्याने आश्चर्य
सर्वसाधारण जातीसाठी पाच तालुक्यांमध्ये दोन उमेदवारांना मते द्यायची होती. परंतु काही उमेदवारांनी एकच मतदान केले. यामुळे निवडणुकीत विजय निश्चित मानला जात असलेल्या उमेदवारांना पराजय स्वीकारावा लागला. यामुळे भविष्यात सिंगल मतदान असलेली मतपत्रिका बाद करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी सभासदांकडून होणार आहे. या निवडणूकीत शिक्षक मतदार असतानाही सर्व मतदार संघातून 478 मते बाद झाली.

अध्यक्षांना तालुक्यात राखता आला नाही गड
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस.डी.भिरूड यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जळगाव तालुक्यात सहकार गटाचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. सहा जागा मिळवून सत्तेपर्यंत जाणार्‍या सहकार पॅनलला मात्र आपला गड राखता आला नाही. जळगाव तालुका मतदार संघातून अपक्ष गोपाळ महाजन व परीवर्तन पॅनलचे तुळशीराम सोनवणे यांनी विजय मिळवला तर सहकार पॅनलचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले.


कॉपी करू नका.