जळगावात जीएमसीत शिशुंची अदलाबदल : 22 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शिशुंचा ताबा मिळताच गहिवरल्या माता


Baby exchange at GMC in Jalgaon: After 22 days of waiting, mothers are deeply saddened to receive the baby जळगाव : एकाचवेळी दोन मातांची प्रसुती झाल्यानंतर नर्सने पालकांना पूत्ररत्न प्राप्त झाल्याचा संदेश दिला मात्र नंतर हा संदेश चुकीने दिल्याचे सांगत एकाला मुलगा व दुसर्‍याला मुलगी झाल्याचे सांगितल्यानंतर जीएमसीत पालकांनी गदारोळ करीत प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर डीएनए चाचणी झाली व मंगळवार, 23 रोजी त्याचा अहवाल आल्यानंतर मूळ अर्भकांचा ताबा मातांकडे देण्यात आल्यानंतर 22 दिवसांनी अर्भक कुशीत येताच दोन्ही माता गहिवरल्या.

गैरसमजुतीमुळे वाढला वाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 2 मे रोजी दोन गरोदर महिलांना अत्यवस्थ झाल्यामुळे शस्त्रक्रियागृहामध्ये सिजर शस्त्रक्रिया करण्यासाठी घेण्यात आले होते. दोन्ही महिलांना झटके येऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. या प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी त्यांचे वैद्यकीय कौशल्य पणाला लावून दोन्ही मातांचे जीव वाचविले मात्र त्याचवेळी निरोपाची गल्लत झाल्याने पालकांनी अर्भक बदलण्यात आल्याचा आरोप केल्याने गोंधळ वाढला. पालकांनी तक्रार केल्यानंतर डीएनए चाचणीचा निर्णय झाला. दोन्ही माता आणि बाळ यांचे डीएनए नमुने घेऊन नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले व मंगळवारी अहवाल प्राप्त झाला.

पोलिसांच्या उपस्थितीत अहवाल वाचन
बहुप्रतिक्षित अहवाल मंगळवारी संध्याकाळी रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला. अनेक दिवसांपासून माता व बाळांची झालेली ताटातूट पाहता प्रशासनाने तात्काळ बाळ मूळ मातांना सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र दिवेकर व रुग्णालय प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही मातांना त्यांच्या नातेवाईकांसह बोलवण्यात आले व त्या ठिकाणी प्रभारी अधिष्ठाता तथा स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जितेंद्र घुमरे यांनी डीएनए अहवाल वाचून दाखविला.

दोन्ही मातांना अश्रू अनावर
अहवालानुसार सुवर्णा उमेश सोनवणे यांना मुलगी तर प्रतिभा प्रवीण भील यांना मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोन्ही मातांना त्यांची बाळ सुपूर्द करण्यात आले. यावेळी दोन्ही मातांना आनंदाश्रू आले होते. या भावपूर्ण प्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. संजय बनसोडे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. शुभांगी चौधरी यांच्यासह डॉ. विनेश पावरा, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. संजीवनी अनेराय, नवजात शिशु विभागाच्या परिचारिका पूजा आहूजा, स्त्रीरोग विभागाच्या कक्ष क्रमांक सहाच्या परिचारिका चारुशिला पाटील याप्रसंगी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !