जनतेत पोलिसांची प्रतिमा उंचावली ; खोटा गुन्हा दाखल होवू दिला नाही : पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे

भुसावळात निरोप समारंभप्रसंगी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे ; 42 संघटनांतर्फे सत्कार


Raised the image of the police among the public; False case was not allowed to be filed भुसावळ : भुसावळ शहरात गेल्या अडीच वर्षांच्या काळात चांगले काम करता आल्याचे निश्चितच समाधान आहे. पूर्वी पोलीस दलाविषयी नागरीकांची प्रतिमा काहीशी निगेटीव्ह होती मात्र पदभार घेतल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य देत गुन्हेगारांवर कठोर कारवाया करण्यात आल्यानंतर नागरीकांचा विश्वास मिळवला व माझ्या कार्यकाळात राजकीय हस्तक्षेप न झाल्याने एकही खोटा गुन्हा दाखल होवू दिला नाही, असे प्रांजळ मत भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी निरोप समारंभप्रसंगी व्यक्त केले. वाघचौरे यांची संगमनेर उपविभागीय अधिकारीपदी बदली झाल्यानंतर भुसावळातील नागरीक समिती तसेच 42 संघटनांनी त्यांचा सहृदय सत्कार करीत निरोप दिला.

भुसावळकरांच्या प्रेमाने भारावलो
सोमनाथ वाघचौरे पुढे म्हणाले की, इतर विभागांच्या तुलनेत भुसावळ विभागातील गुन्हेगारी कमी असलीतरी नागरीकांमध्ये पोलिसांविषयी नकारात्मक दृष्टिकोन होता तो पदभार घेतल्यानंतर कमी करण्यावर भर दिला. पूर्वी वैयक्तिक वैमनस्यातून खोटे गुन्हे दाखल केले जात होते. विशेषतः त्यात राजकीय गुन्ह्यांचे प्रमाण अधिक होते मात्र माझ्या कारकिर्दीत एकाही व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल झाला नाही. कार्यालयात परवानगीशिवाय व मोबाईलसह येण्याची मुभा आपण दिली व कार्यालयाबाहेर मोबाईल काढून ठेवण्याची परंपरा बंद केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वाघचौरे म्हणाले की, व्यापारी वर्गाला आश्वस्त केल्याने खंडणी प्रकाराला आळा बसला शिवाय अवैध सावकारांवरही मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. खाकी वर्दीतला सच्च्या मनाचा अधिकारी भुसावळकरांनी यावेळी गहिवरताना पाहिला तसेच त्यांना काहीसे गहिवरूनही आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, गौरव समितीचे प्रमुख राध्येश्याम लाहोटी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पोलीस उपअधीक्षकांचे कार्य कौतुकास्पद : आमदार संजय सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांचे भुसावळातील कार्य कौतुकास्पद राहिले. त्यांच्या कार्यकाळात शहरातील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर अंकुश लागला त्यामुळे आज येथे मोठ्या संख्येने शहरवासी त्यांना निरोप देण्यासाठी आले आहेतख असेही आमदार म्हणाले.

व्यापार्‍यांना केले आश्वस्त : राध्येश्याम लाहोटी
गौरव समितीचे प्रमुख राध्येश्याम लाहोटी म्हणाले की, भयमुक्त भुसावळ व भयमुक्त व्यापार करण्याची खात्री वाघचौरे यांनी आम्हा व्यापार्‍यांना पहिल्याच बैठकीत दिली होती व बोलल्याप्रमाणे त्यांनी कृतीदेखील करीत आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांचे सामाजिक कार्यदेखील तेव्हढेच महत्त्वाचे होते, असेही लाहोटी म्हणाले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, किरण कोलते, अ‍ॅड.निर्मल दायमा, साबीर शेख, राजश्री सुरवाडे, संगीता भामरे, वैद्य रघूनाथ आप्पा सोनवणे, चाँद तडवी, आनंद ठाकरे, शेख पापा, प्र.ह.दलाल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. नागरी गौरव समितीचे समन्वयक नाना पाटील यांनी वाघचौरे यांच्यासह नूतन उपअधीक्षकांचा विविध घटनांचा संदर्भ देत गौरव केला. नागरी गौरव समितीतर्फे मानपत्र, शाल ड्रेस व वृक्ष आदी देऊन वाघचौरे परीवाराचा सत्कार करण्यात आला. नाना पाटील यांनी तयार केलेल्या मानपत्राचे वाचन अ‍ॅड.नितीन खरे यांनी केले. शहरातील 42 पेक्षा अधिक सामाजिक संघटनांनी वाघचौरे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक अ‍ॅड.तुषार पाटील तर सूत्रसंचलन गौरव समितीचे समन्वयक नाना पाटील यांनी तसेच आभार सुरेंद्रसिंग पाटील यांनी मानले.


कॉपी करू नका.