गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या डंपरची धडक : चोपडा आमदार लता सोनवणेंसह चौघे जखमी


Collision with a dumper transporting secondary minerals : Chopra MLA Lata Sonavane, four injured जळगाव : गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या भरधाव डंपरने चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला जबर धडक दिल्याची घटना शनिवारी करंज गावाजवळ शनिवारी रात्री घडली. या अपघातात आमदारांसह चौघे किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी रात्री उशिरा अज्ञात डंपर चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातानंतर डंपर चालक पसार
शनिवारी संध्याकाळी सात वाजता कुरवेल ते तावसा या रस्त्याचे आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते भूमिपूजन होते. तो कार्यक्रम आटोपून आमदार सोनवणे यांच्यासह त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे रात्री आपल्या इनोव्हा कार (एम.एच. 19 बी.यू. 0999) ले चोपड्याकडून जळगावकडे येत असताना रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील करंज गावाजवळ जळगावकडून चोपड्याकडे जाणार्‍या भरधाव डंपर (क्र.एम.एच.19 झेड 6245) ने आमदार लता सोनवणे यांच्या वाहनाला जबर धडक दिली. या धडकेत इनोव्हा वाहनाचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. तर आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, अंगरक्षक पोलीस नाईक अमित पिजांरी आणि चालक दीपक पवार हे जखमी झालेत. सर्व जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून पसार झाला.

डंपर चालकाला अखेर अटक
चालक दीपक सुभाष पवार यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.


कॉपी करू नका.