वटार गावात सिलिंडर लीक होताच स्फोट : तीन घरे खाक
Explosion in Vatar village as cylinder leak : Three houses destroyed चोपडा : गॅस गळती झाल्यानंतर सिलिंडरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात त्याचा स्फोट होवून तीन घरांना आग लागल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील वटार गावात सोमवारी रात्री आठ वाजता घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले तर संसारोपयोगी सामान पूर्णपणे जळून खाक झाले. आगीनंतर गावकर्यांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
शेजारच्या घरांनाही बसली आगीची झळ
जळगाव व चोपडा येथून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून रात्री पर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी, पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले. जखमींना अडावद रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वटार येथील कैलास भिका कोळी यांच्या घरी रात्रीचं जेवण तयार करीत असतांना गॅस नळीने अचानक पेट घेऊन क्षणार्धात गॅस हंडीचा स्फोट झाला. घराला आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात कैलास कोळी व सरलाबाई कोळी ह्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ अडावद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान कैलास कोळी यांच्या घराला आग लागल्यानंतर धनसिंग खंडू कोळी, भिकुबाई सुभाष कोळी यांच्या घरांनाही आगीने कचाट्यात घेत जळून खाक केले.
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आगीचे वृत्त परीसरात पोहोचताच वडगाव, सुटकार व वटार तिघेंही गावातील लोकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यांनतर चोपडा येथून 2 व जळगाव येथून अग्निशमन बंब दाखल होऊन आग विझविण्याचे काम केले. घटनास्थळी नायब तहसीलदार सचिन भामळे, सर्कल व्ही.डी. पाटील, तलाठी महेंद्र पाटील, अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी धाव घेतली. जि.प.सदस्य शांताराम पाटील, राकेश पाटील,मंगल इंगळे, सचिन महाजन, सरपंच गोपाल ठाकरे ,भाजप,सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


