जळगावातील कुविख्यात गुन्हेगार पुणे कारागृहात स्थानबद्ध
जळगाव जिल्हाधिकार्यांचे आदेश : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
Notorious criminals from Jalgaon lodged in Pune Jail जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या उपद्रवींवर धडक कारवाईचा सपाटा जळगाव पोलीस दलाकडून सुरू आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील संशयित किरण शंकर खर्चे (30, खूबचंद साहित्या नगर, जळगाव) यास जळगाव जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर संशयिताला मिरा भाईंदर येथून ताब्यात घेत पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. संशयित खर्चेविरोधात हाणामारी, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण तसेच शरीराविरोधात ईजा केल्याचे तब्बल 17 गुन्हे तर अन्य सहा अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.
एमआयडीसी पोलिसांनी सादर केला प्रस्ताव
संशयित खर्चे हा गुन्हा केल्यानंतर जामिनावर सुटताच पुन्हा गुन्हे करीत असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी संशयितास स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. 14 मे रोजी गुन्हे शाखेकडे प्रस्ताव आल्यानंतर अवलोकन केल्यानंतर हा प्रस्ताव जळगाव जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शनिवार, 3 रोजी संशयितास स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. संशयित जळगाव शहरात नसल्याने त्याचा एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने चार दिवस मुंबईत शोध घेतला. मंगळवारी मिरा भाईंदर येथून त्यास ताब्यात घेत येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
यांनी केली कारवाई
संशयिताला मुंबईत अटक करण्याकामी एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस दत्तात्रय पोटे, अतुल रघुनाथ वंजारी, सचिन किरण पाटील, योगेश देविदास बारी, नाना तायडे, किरण पाटील तसेच काश्मीरा गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजू तांबे, अविनाश गरजे, संदीप शिंदे, सचिन सावंत, प्रशांत विसपुते यांच्या पथकाने परीश्रम घेतले तर एमपीडीएची कारवाई जळगाव अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनूस शेख इब्राहिम, सुनील पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, ईश्वर पंडीत पाटील आदींच्या पथकाने केली.


