चाळीसगाव तालुक्यातील दोन खुनांचे हे धक्कादायक कारण आले समोर : वाचून बसेल धक्का
जामडीत गावातील तरुणाची हत्या पूर्व वैमनस्यातून तर चिंचखेड्यात पित्याची कौटुंबिक वादातून हत्या
Chalisgaon taluka rocked by double murder जळगाव : चाळीसगाव तालुक्यात गुरुवार काळवार ठरला. जामठी व चिंचखेडा येथे झालेल्या हत्येने तालुक्यात मोठी खळबळ उडाली. पहिल्या घटनेत जामडी, ता.चाळीसगाव येथील तरुणाने बहिणीशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तिने आत्महत्या केल्याच्या रागातून मयताच्या अल्पवयीन भावाने चाकूचे वार करीत तरुणाचा खून केला तर दुसर्या घटनेत चिंचखेडे शिवारात प्रौढ शेतकर्याची दोघा मुलांनीच कौटुंबिक वादातून गळा आवळून व डोक्यात धारदार शस्त्र मारून हत्या केली. तरबेज शहा याकूब शहा (25, जामडी) व राजेंद्र सुकदेव पाटील (55, रा.देवळी, ता.चाळीसगाव) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत.
जामडीत फकिर तरुणाची हत्या : अल्पवयीन ताब्यात
जामडी येथील तरबेज शहा याकूब शहा (25, जामडी) या तरुणाची अल्पवयीन तरुणीने चाकू मारून हत्या केली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीनास ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत अल्पवयीनासह अन्य संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चिंचखेडे शिवारात जन्मदात्याची हत्या : दोघा मुलांना अटक
देवळी गावातील रहिवासी राजेंद्र सुकदेव पाटील (55, रा.देवळी, ता.चाळीसगाव) यांची कौटूंबिक वादातून त्यांच्या मुलांनीच हत्या केली. पाटील हे बुधवारी रात्री शेतात झोपण्यासाठी गेल्यानंतर मध्यरात्री त्यांच्या दोघा मुलांनीच गळा आवळून तसेच डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. गुरुवारी सकाळी हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर मेहुणबारे पोलिसांना माहिती देण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्यासह अधिकार्यांनी धाव घेतली. घटनास्थळी दोरी, रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कुटूंबात वाद सुरू होता व त्यातून त्यांच्या दोघा मुलांनीच वडिलांची मध्यरात्री हत्या केली असल्याची माहिती चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिली.


