बीटकॉईनमधील परताव्याच्या आमिषाने जळगावातील तरुणाला 91 हजारांचा गंडा
91 thousand to the youth with the lure of refund in Bitcoin जळगाव : बीट कॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष दाखवत जळगाव शहरातील हर्ष धनश्याम अडवाणी (रा.रींग रोड जळगाव) या तरुणाची 91 हजार 400 रुपयांची फसवणूक करण्यात आली. तरुणाच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात सायबर चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
आमिषाला तरुण भाळला
हर्ष अडवाणी हा तरुण 4 फेब्रुवारी रोजी ईस्टाग्राम पाहत असताना त्याला सौरव बिटकॉइन ट्रेडर्स हे अकाउंट दिसले. त्यावर चॅट करत असताना बिटकॉइनमध्ये 20 हजाररुपये गुंतविले तर दोन तासात तुम्हाला चांगला नफा होईल, असे सांगण्यात आले. हर्ष याने विश्वास ठेवून 20 हजार रुपये ऑनलाईन पाठविले. दोन तास उलटूनही नफ्याची रक्कम मिळाली नाही म्हणून त्याने त्या अकाउंटवर मेसेज केले. त्यावर त्याला हॅण्डलिंग चार्ज म्हणून 25 हजार 800 रुपये भरण्यास सांगितले. ही रक्कम देखील त्याने ऑनलाईन भरल. मात्र नेट बिझी असल्यामुळे तुमचे पैसे आलेले नाही, असे सांगण्यात आल्यावर हर्ष याने पुन्हा 10 हजार रुपये पाठविले नंतर, अकाउंटची मर्यादा संपली असून दुसर्या अकाउंटवर पैसे गुंतवणूक करू शकतात, असे सांगण्यात आले. त्याने दुसर्या अकाउंटवर 12 हजार 600 गुंतविले. रविवार, 5 फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा हर्ष याला सिक्युरीटी चार्जेस म्हणून 23 हजार रुपये भरण्याबाबतचा एसएमएस प्राप्त झाला. त्यानुसार ती रक्कमही त्याने भरली आणि गुंतविलेले पैशांचे प्रॉफीट मला दाखवा, असे सांगितले मात्र त्याला उडवा-उडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर गुरुवारी हर्ष याने जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तपास हवालदार सलीम सुभान तडवी करीत आहेत.


