एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या पाच दुचाकींसह जिल्ह्यातील त्रिकूट जाळ्यात
Major achievement of MIDC police : Trikut in the district with five stolen bikes जळगाव : जिल्ह्यात दुचाकी चोरींचे सत्र सुरू असतानाच एमआयडीसी पोलिसांनी पारोळासह भडगाव व नाशिक जिल्ह्यातून पाच दुचाकी चोरी करणार्या जिल्ह्यातील त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे चोरटे हे गॅरेज काम करणारे मॅकेनिक आहेत. नंदकिशोर उर्फ बाळा सुभाष पाटील, हर्षल उर्फ दादू सुभाष देवरे (दोघे रा.सावरखेडे, ता.पारोळा) व संदीप राजेंद्र पाटील (रा.करमळा, ता. पारोळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
चोरीच्या तपासादरम्यान गवसले संशयित
जळगावच्या अयोध्या नगरातील अनिकेत पवार यांची अॅक्टीव्हा मोटार सायकल एप्रिल महिन्यात चोरीला गेल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. चोरीच्या तपासादरम्यान एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पारोळा तालुक्यातील रहिवासी व गॅरेजवर काम करणार्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. जळगावच्या गुन्ह्याव्यतिरीक्त अन्य चार दुचाकी इंदीरानगर, नाशिक आणि पारोळा पोलिसात तसेच भडगाव आणि भडगाव-पाचोरा रस्त्यावरुन चोरी केलेल्या आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, जितेंद्र राजपूत, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, छगन तायडे, ईश्वर भालेराव, चालक इम्तीयाज खान आदींनी आरोपींना अटक केली. तपास हवालदार गणेश शिरसाळे करीत आहेत.


