अमळनेर दंगल प्रकरणी 29 संशयितांना अटक : 48 तास कर्फ्यू
दगडफेकीत पोलीस अधिकार्यासह सहा पोलीस कर्मचारी जखमी : शहराला छावणीचे स्वरूप
29 suspects arrested in Amalner riot case: 48 hours curfew अमळनेर : ओट्यावर व्हिडिओ पाहत बसलेल्या मुलांमध्ये झालेला शाब्दीक वाढ वाढत गेल्यानंतर शहरातील दोन गटात दंगल उसळली व दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. दोन समाजातील गट जमल्यानंतर जमावातील एकाने पोलीस अधिकार्यावर तलवार हल्ला केला तर सहा अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. दोन्ही गटातील 61 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 29 जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, शहरातील तणावाची स्थिती पाहता उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी तीन दिवसांसाठी 144 कलम प्रमाणे संचारबंदी (कफ्यू) लागू केली आहे.
किरकोळ वादातून उसळली दंगल
शुक्रवार, 9 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जिनगर गल्लीत दोन गटात दगडफेक सुरू झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख पोलीस ताफ्यासह हजर झाले तर काही वेळात प्रभारी अधिकारी रामदास वाकोडे, पारोळा पोलिसांसह हजर झोल असता दोन्ही गटाच्या हातात लाठ्या-काठ्या दगड होते. पोलीस त्यांना शांततेचे आवाहन करीत असताना जमावाने घोषणाबाजी केली आणि पोलिसांवर फरश्या व दगडांनी हल्ला चढवला. इरफान जहुर बेलदार याने तलवारीने सहा.निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्यावर वार केला, त्यांनी तो चुकवला. पण त्यांच्या पायाला लागून हाड फ्रॅक्चर झाले. तसेच जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक देशमुख, हितेश बेहरे, राहुल पाटील, धुळे आरसीएफचे अनिल सोनवणे, मगनराव घटे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले.
29 संशयित ताब्यात
पानखिडकी भागात इलेक्ट्रिक डीपीवर आणि घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर लागलीच खड्डा जीन भागात दुसर्या गटाने दगडफेक केली. काही वेळात जुना पारधीवाडा भागात दगडफेक झाली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, चोपडा डीवायएसपी ऋषिकेश रावळे यांनी रात्री पाहणी केली. रात्रीच 29 जणांना ताब्यात घेण्यात आले. 61 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगल व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर शहरात 48 तास संचारबंदी
शुक्रवारी रात्री दहा वाजता शहरात झालेल्या दगडफेकीनंतर अमळनेर शहरात शनिवार, 10 जून रोजी सकाळी 11 ते रविवार, 12 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. आवश्यकता वाटल्यास संचारबंदीमध्ये आणखी वाढ करण्यात येणार असून अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे.


