कौटुंबिक वादातून एरंडोलला पत्नीची हत्या : आरोपी पतीला दोन दिवसांची कोठडी
Erandol wife killed due to family dispute : Accused husband remanded for two days एरंडोल : दाम्पत्यात झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर संतप्त पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी मारून तिचा खून केल्याची घटना गांधी पुरा, वखारीजवळील भागात सोमवार, 19 जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत हर्षदा किरण मराठे (27, गांधी पूरा, वखारीजवळ) या विवाहितेचा संशयित आरोपी तथा पती किरण महादू मराठे (35) याने खून केला होता. खूनानंतर स्वतःच संशयित पोलिसात हजर झाला व त्याने खुनाची माहिती यंत्रणेला दिल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली होती.
कौटूंंबिक वादातून डोक्यात मारली फरशी
मराठे दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वाद सुरू असताना सोमवारी पुन्हा दाम्पत्यात वाद उफाळून आल्यानंतर संतप्त पती किरणने पत्नी हर्षदाच्या डोक्यात घरातील फरशी मारल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होवून तिचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी संशयित पती किरणला अटक केल्यानंतर मंगळवारी एरंडोल न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

