भुसावळ बसस्थानकाच्या डांबरीकरणासह इलेक्ट्रीक बस मिळणार
आमदार सावकारेंच्या पाठपुराव्यानंतर मंत्री भुसेंची ग्वाही
Electric buses will be available along with asphalting of Bhusawal bus stand
भुसावळ : भुसावळ बसस्थानकाची झालेली दुरवस्था रोखण्यासह बस पोर्टचा प्रश्न तसेच इलेक्ट्रीक बसेसच्या उपलब्धतेबाबत पावसाळी अधिवेशनात भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी बसपोर्ट बाबत वास्तुस्थिती तपासून कार्यवाही करण्यासह आगामी काळात इलेक्ट्रीक बसेस उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली तसेच बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी दोन कोटी 18 लाखांचा निधी प्रस्तावीत करण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली.
बसस्थानकाच्या दुर्दशेबाबत वेधले लक्ष
आमदार संजय सावकारे म्हणाले की, भुसावळ बसस्थानकाची स्थिती अंत्यत बिकट झाली असून या बसस्थानकाला बसपोर्ट उभारणीबाबत गतकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले मात्र प्रश्न सुटला नाही तर बसस्थानकाची स्थिती अत्यंत बिकट असल्याने पावसाळ्यात पाणी साचून प्रवाशांना त्रास सोसावा लागतो. पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या चौफुलीवरील जागेत बीओटी तत्वावरील दुसरे बसस्थानक उभारणीचे नियोजन होते मात्र आता महामार्गामुळे ही जागा कमी झाल्याने या जागेवर बीओटी तत्वावर बसस्थानक उभारल्यास तेथे बाहेर जिल्ह्यातून जाणार्या, लांब पल्ल्याच्या एसटींना थांबा देता येईल.
भुसावळ बसस्थानकाला नवीन 20 इलेक्ट्रीक बसेस उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांचे हाल थांबतील, असे आमदार संजय सावकारे म्हणाले. सार्वजनिक बांधकाम, सामाजिक उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी भुसावळ येथे बसपोर्ट उभरण्याबाबत यापूर्वी काही कार्यवाही झाली असेल तर ती वस्तुस्थिती तपासून त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. राज्य परीवहन मंडळाच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रीक बसेस उपलब्ध होणार आहेत, यातून भुसावळलाही इलेक्ट्रीक बसेस उपलब्ध करुन दिल्या जातील, असे सांगितले. यामुळे भुसावळ बसस्थानकाच्या आगामी काळात सुधारणा होतील, अशी आशा आहे.
