कविता अंधार चिरत उजेडवाट तयार करत थेट हृदयाला भिडते

द्वारकाई व्याख्यानमाला : द्वितीय पुषात एरंडोलचे कवी विलास मोरे यांचे मत


The poem cuts through the darkness and creates a path of light that strikes directly at the heart भुसावळ : कविता जीवन संघर्षात आनंद वेचून सहर्ष जगण्याचा मार्ग दाखवते. जन्म आणि मृत्यू यांच्यातील जे अंतर आहे त्यात कविता प्रत्येक टप्प्यावर हमखास भेटते. कविता प्रखर गुरुनिष्ठा शिकवून आमरण धीर, धैर्य व ध्येय देऊन जीवन सार्थक करते, असे मत एरंडोलचे कवी विलास मोरे यांनी भुसावळात व्यक्त केले. भुसावळात जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती द्वारकाई व्याख्यानमाला आयोजित केली आहे. बुधवार, 26 जुलै रोजी आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालयात ‘या बाळांनो फुलवू कवितेचा मळा’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफण्यात आले. त्यात कवी मोरे यांनी संवाद साधला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी आर.जी.झांबरे विद्यालयाचे चेअरमन ए.एन. शुक्ला होते. प्रमुख पाहुणे म्हणून सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव बी.जी.सरोदे, संचालक जे.एच.चौधरी, जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष आर.आर.बावस्कर, चैत्राम पवार, मुख्याध्यापक एस.बी.कुमावत यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष तथा जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा फाउंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांनी मांडली. सूत्रसंचालन राजेश महाजन यांनी केले. द्वारकाई फिरती व्याख्यानमाला हा उपक्रम वैचारीक चळवळ प्रवाहित ठेवणारा उपक्रम आहे. नऊ वर्षे झाली तरी त्यात सातत्य आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी यातून लागेल, असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.एन.शुक्ला यांनी व्यक्त केला.

कविता हृदयाचं तळघर जागवते
कविता आत्म्याचा प्रकाश आहे. अंधार चिरत ती प्रकाशवाट तयार करत पुढे सरकते. पाठ्यपुस्तकात असलेल्या कविता समजून घ्या. हृदयाचं तळघर दणाणून सोडण्याची क्षमता कवितेत आहे. लढण्याचं बळ ती देते. बालकांच्या मनात डोकावून लिहिलेलं साहित्य मनात नेहमी रूंजी घालते, असे कवी मोरे यांनी नमूद केले.

विज्ञानावरील कविता भावल्या
कवयित्री बहिणाबाई चौधरी, भा.रा.तांबे, वि.वा.शिरवाडकर, बालकवी यांच्या कविता कवी मोरे यांनी लयबद्ध सादर केल्या. त्यानंतर त्यांनी स्वलिखित ‘स्वप्नामध्ये आला माझा एक घोडा’, ‘नको परीकथा नको बागुलबुवा, पप्पा मला आणा’, ‘कधी तरी आई अभ्यास माझा घे ना, मोबाइल वेळ दे मला’ या कविता सादर केल्या. त्यातून त्यांनी ज्ञान, विज्ञान, जीवन ही त्रिसूत्री मांडली.

व्याख्यानमालेचा आज समारोप
तृतीय समारोपाचे पुष्प शुक्रवार, 28 दुपारी 12 वाजता नाहाटा महाविद्यालयात गुंफण्यात येईल. ‘वर्तमान समजून घेताना : संवाद, गप्पा, कविता’ हा विषय इचलकरंजीचे प्रा.रोहित शिंगे हे गुंफणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !