मुक्ताईनगरात महिला अत्याचाराच्या विरोधात मूक मोर्चा
Silent march against women oppression in Muktainagar मुक्ताईनगर : मणिपुरात महिलांची काढण्यात आलेली नग्न धिंडे, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर झालेली हत्या, एरंडोल तालुक्यातील खडके वस्तीगृहात अल्पवयीन मुलींचे झालेले शोषण आदी घटनांच्या निषेधार्थ दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मुक्ताईनगरात सर्वपक्षीय मूक मोर्चा मंगळवारी काढण्यात आली. यावेळी मोर्चात सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना पदाधिकारी, नागरीक महिला, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या
अप्रिय घटनांना पायबंद हवा, दोषींना मिळावी फाशीची शिक्षा
महिला भगिनींवर अत्याचार करणार्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या संदर्भातील खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अत्याचाराच्या वाढत्या घटना बघता गुन्हेगारांवर जलद गतीने कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदा करून गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, अशी मागणी मुक्ताईनगर तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आली. प्रवर्तन चौकापासून मूक मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयाजवळ प्रमुख उपस्थितांनी मोर्चाला संबोधित केले
यावेळी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून सदर घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत महिलांसह मुलींना संरक्षणाची मागणी केली.

राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली
शिवसेना (उबाठा) विभागीय कामगार सेना अध्यक्ष अॅड.मनोहर खैरनार म्हणाले की, राज्यासह देशात कायदा-सुव्यवस्था बिघडली असून सत्ताधार्यांच्या मनमानी पुढे यंत्रणा लाचार झाली आहे. महिला सुरक्षा विधेयकाचे काय झाले ? असा प्रतिप्रश्न त्यांनी केल.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील म्हणाले की,
राज्यात देशात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे त्यामुळे मणिपूर, भडगावसारख्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत.
14 ऑगस्टपासून स्वयंसिद्धा अभियान राबवणार : अॅड.रोहिणी खडसे
अॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, राज्यासह देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मणिपूर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारला जाग आली तोपर्यंत प्रशासन, न्याय व्यवस्था कुंभकर्णी झोपेत होती परंतु अद्यापही त्या आरोपींवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एरंडोल तालुक्यातील वसतिगृहात 12 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची बाब निषेधार्थ आहे. गोंडगाव येथे घडलेली घटना अत्यंत अमानवीय निर्दयी आह. माणसाचा मूळ रानटी स्वभाव कायम असून स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे या घटनांमधून जाणवते. स्त्रियांवरील अत्याचार समाजात ज्या पद्धतीने पाहिले जातात, त्यावर सामाजिक भूमिका बदलायला हवी. अत्याचाराच्या विरोधात स्त्रियांची भूमिका कणखर होणे आवश्यक आहेच पण शिवाय याविरुद्ध काय पाऊल उचलता येईल, कायदा काय म्हणतो आणि मदत कुठे मागता येईल, याविषयी समाजजागृती करणे आवश्यक आहे. माता भगिनींना स्व-रक्षणाचे धडे देण्यासाठी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात 14 ऑगस्टपासून स्वयंसिद्धा अभियान राबविणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी जाहीर केले.

पीडीत कुटूंबाला संरक्षण व अर्थसहाय्य द्यावी : आमदार एकनाथराव खडसे
माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे मोर्चाला संबोधित करताना सांगितले की, राज्यात देशात घडणार्या घटनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. देश प्रगती करत असला तरी महिला अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या घटना मन विषण्ण करणार्या व माणुसकीला काळिमा फासणार्या आहेत. गोंडगाव व एरंडोल घटनांबाबत विधानपरीषदेत आवाज उठवला तेव्हा सर्व आमदारांना धक्का बसला, सर्वांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. कधी संस्कार कमी पडतात म्हणून समाजाकडे बोट दाखवले जाते परंतु आता महिलांनी सुद्धा स्व-रक्षण करण्यासाठी स्व-रक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा होण्याची वेळ आली आहे.
महिला अत्याचाराच्या घटना जलद गती न्यायालयात चालवाव्या त्यासाठी सरकारने अनुभवी वकील नेमावा व पीडीत कुटुंबाला संरक्षण तसेच आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी केली. यावेळी मोर्चात सर्व पक्षीय नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरीक महिला, विद्यार्थीनी सहभागी झाल्या.
