चंद्रयान- 3 मोहिमेत सहभागी वैज्ञानिक डॉ.माधवी ठाकरे यांनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद
विद्यार्थी वैज्ञानिकांना पाठवणार शुभेच्छा भेट कार्ड : महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम
वरणगाव : चंद्रयान- 3 मधील ऑप्टिक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून लेंडर कॅमेरा विकसीत करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या इस्रोचे वरीष्ठ वैज्ञानिक डॉ माधवी ठाकरे यांनी महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यांना या कॅमेराद्वारे पोझिशन कॅमेरा आणि लॅन्डर हझारड, डिटेक्शन ऍडव्हान्स कॅमेरा तयार करण्याची जबाबदारी होती या महाराष्ट्राच्या कन्या व सध्या अहमदाबाद येथील संस्थेत वरीष्ठ वैज्ञानिक काम करत आहे. चंद्रयान- 3 बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग झाले. या घटनेचे औचित्य साधून महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी मोबाईलद्वारा संवाद साधला.
लक्ष साध्य होत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करा
डॉ.ठाकरे म्हणाल्या की, लँडिंग झाल्यानंतर इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला परंतु हा क्षण त्यांच्यासाठी अतिशय कठीण असल्याचे त्यांनी सांगत भारताने ही मोहिम यशस्वी केल्याने चंद्राविषयीची खूप माहिती आता मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठे बघा, साध्य करा आपण जे करतो ते समजून घ्या व त्यामधील डीप ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न करा, आपल्यासमोर लक्ष ठेवा लक्ष साध्य होत नाही तोपर्यंत त्याचा मागोवा घ्या, तुम्ही विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व देशासाठी सेवा करायची ही मनाशी खुणगाठ बांधा, असा सल्ला त्यांनी दिला व लवकरच विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्या वरणगावात येणार असल्याचे यावेळी सांगितले. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण होत्या. यावेळी पर्यवेक्षक बी.एम.राठोड, विज्ञान शिक्षक सुनील वानखेडे, वाय.आर.पाटील, एच.एस.पाटील, महेंद्र भंगाळे, लक्ष्मीकांत नेमाडे व शिक्षक उपस्थित होते

चंद्रयान मोहिमेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती
यावेळी सुनील वानखेडे यांनी चंद्रयान तीन तयार करण्यासाठी व उड्डाणासाठी लागलेला खर्च यामध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान त्याचप्रमाणे चंद्रावरती उतरलेल्या लँडर व रोव्हर याचे कार्य समजावून सांगून या मोहिमेतून मानवाला होणारा फायदा तसेच भविष्यातील चंद्रावरील सजीव सृष्टी याबाबतची माहिती दिली. मुख्याध्यापिका वंदना इंगळे यांनी बोलताना सांगितले की, चंद्रयान 3 ही मोहिम सुवर्ण अक्षरात लिहिली जाणारा क्षण आहे. या अथक परिश्रमातून जीपीएस सिस्टीम या ठिकाणी नसताना अनोळखी चंद्रावरील पृष्ठभागावर ती लँडिंग करणे ही कठीण बाब होती मात्र विविध तंत्रज्ञान संस्थांच्या मदतीने कठीण वाटणारे काम सोपे करून दाखवले यामुळे या मोहिमेचा भविष्यात नव्या पिढीला खूप मोठा फायदा होणार आहे याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे
