भुसावळात आमदार एकनाथराव खडसेंना धक्का : राष्ट्रवादीतील चौघे भाजपाच्या वाटेवर !
Bhusawalat MLA Eknathrao Khadse shock : NCP four on the way to BJP! भुसावळ : भुसावळ भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील आमदार खडसेंचे कट्टर समर्थक भाजपात लवकरच प्रवेश करीत आहेत. या संदर्भात गोपनीय बैठकीत पक्ष प्रवेशावर एकमत झाले असून आगामी काळात एका कार्यक्रमात चौघांचा प्रवेश निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले दोन नगरसेवक व एक नगरसेविका पुत्र, नगरसेविककेचे पती आता पुन्हा भाजपच्या वाटेवर आगामी काळात भाजपात इनकमिंग वाढणार आहे. चौघांच्या भाजपात पक्ष प्रवेश निश्चित असून त्यानंतर अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता असून आमदार खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर आमदार सावकारे यांची मात्र स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.
लवकरच होणार पक्ष प्रवेश
पालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविलेल्या 11 नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. यानंतर अद्यापही निवडणूक झालेली नाही. या दरम्यान आता पून्हा काही नगरसेवक भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीत खडसेंच्या नेतृत्वात गेलेले माजी नगरसेवक किरण कोलते, माजी नगरसेविका मेघा वाणी यांचे पती देवेंद्र वाणी आदींसह काही पदाधिकारी पून्हा भाजपमध्ये गेले आहेत तर आता पुन्हा दोन माजी नगरसेवक, माजी नगरसेविकेचे पती व एक माजी नगरसेविकेचे पुत्र भाजपच्या वाटेवर आहे. याबाबत आमदार संजय सावकारे यांच्यासोबत प्राथमिक चर्चाही झाली असून या चारही माजी नगरसेवकांचा भाजमध्ये लवकरच प्रवेश निश्चित आहे. माजी प्रभारी नगराध्यक्षांचाही समावेश आहे. मात्र हा प्रवेश नेमका कधी होईल? याबाबत स्पष्टता नाही. निवडणूकीच्या पूर्वी राष्ट्रवादीतील अजून काही माजी नगरसेवक व काही पदाधिकारी हे भाजपाची वाट धरतील, अशी शक्यता आहे.

आमदारांच्या नेतृत्वावर विश्वास
पूर्वी आमदार खडसे हे भाजपात असल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पदाधिकार्यांनी भाजपात प्रवेश केला मात्र खडसेंनी भाजपा सोडल्यानंतर कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत आले मात्र आता शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहे. केंद्रासह राज्यात भाजपाची असलेली सत्ता, आमदार संजय सावकारे यांचा वाढलेला प्रभाव तसेच आगामी निवडणुका, नगरसेवकांना विकासकामांसाठी मिळणारा निधी पाहता अनेकांनी भाजपाची वाट धरली आहे त्यामुळे आमदार संजय सावकारे हे हेवीवेट नेते ठरले आहेत. भाजपाने बाजार समिती निवडणुकीत विरोधकांचे पानीपत केल्यानंतर सावकारेंच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्याने भाजपात एकीकडे इनकमिंग वाढले असताना दुसरीकडे राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडत असल्याने खडसेंसाठी ही बाब धक्का मानली जात आहे.
चांगल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत : आमदार संजय सावकारे
भाजपात चांगले पदाधिकारी प्रवेश करीत असतील तर त्यांचे निश्चितच स्वागत आहे, असे आमदार संजय सावकारे म्हणाले. पक्ष प्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही वा तशी अधिकृत चर्चादेखील झालेली नाही. आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, जाणारे कार्यकर्ते आपल्या परवानगीनेच जात आहे मात्र आगामी काळात ते पुन्हा राष्ट्रवादीत परत येतील, त्यांचा आपल्या नेतृत्वावरच विश्वास आहे.
