पावसाने फिरवली पाठ : हतनूर धरणात केवळ 46 टक्के जलसाठा शिल्लक
Rains turn back : Only 46 percent water storage left in Hatnoor Dam भुसावळ : पावसाने ओढ दिल्यानंतर शेतकर्यांची चिंता वाढली असून दुसरीकडे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारल्यानंतर सोमवारी दुपारी 12 वाजता धरणाचे चार दरवाजातून होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास धरणात 46 टक्के जलसाठा होता तर 211.530 मीटर इतकी जलपातळी होती. हतनूर धरणाच्या पाणलोेटक्षेत्रात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस नसल्याने धरणातील आवक मंदावली आहे. यामुळे हतनूर प्रशासनाने धरणातून होणारा विसर्ग थांबवला आहे. रविवारपर्यंत धरणाचे दोन दरवाजे एक मिटरने तर दोन दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग करण्यात आला होता मात्र पावसाअभावी आवक नसल्याने सोमवारी दुपारी 12 वाजता खुले असलेले दरवाजे बंद करुन जलपातळी वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यंदा हतनूरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक हजार 53 मिली पावसाची तूट आहे.
ऑक्टोंबरपर्यंत धरण भरण्याचे नियोजन
हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा तीन हजार 253 मिली पाऊस झाला तर गतवर्षी तो चार हजार 306 मिली होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदा एक हजार 53 मिली पाऊस कमी झाला आहे. सुमारे 20 दिवसांपासून तापी व पूर्णा नदीच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा पत्ताच नाही तर धरणात येणारी दररोजची पाण्याची आवक ऐन श्रावण महिन्यातच कमी झाल्याने पूर नियंत्रणाच्या नियमांनुसार 21 ऑगस्टपर्यंत धरणात 46 टक्के जलसाठा करणे अपेक्षीत होते. भविष्यात पाणलोटक्षेत्रात पावसाने दडी मारली तरी 10 ऑक्टोंबरपर्यंत 100 टक्के जलसाठा पूर्ण करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.








