रेल्वे प्रवास होणार आणखीन जलद : सहा गाड्यांची ताशी 130 वेगाने चाचणी
इगतपुरी-बडनेरा मार्गावर 67 ट्रेन वेगवान धावण्याचे नियोजन ः अर्धा तास आधी होणार प्रवास
भुसावळ : रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलदगतीने व अधिक सुखद होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा भर आहे. त्यानुषंगाने भुसावळ विभागातील 526.76 किलोमीटर लांबीच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात आगामी काळात 67 रेल्वे गाड्या ताशी 130 किलोमीटर प्रतिवेगाने चालवण्याचे नियोजन असून त्यासाठी सहा रेल्वे गाड्यांची चाचणी नुकतीच यशस्वीरीत्या घेण्यात आली. या चाचणीमुळे अप दिशेने 30 मिनिटे तर डाऊन दिशेने 28 मिनिटे वेळेची बचत होणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाव्यवस्थापक कार्यालयाकडून मंजुरी मिळताच आगामी काळात लवकरच या गाड्यांचा वेग वाढणार असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.
सहा रेल्वे गाड्यांची चाचणी यशस्वी
रेल्वे प्रशासनाने 12289 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, 12290 नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 12105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, 12106 गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विदर्भ एक्सप्रेस, 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा गीतांजली एक्सप्रेस, 12860 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस या गाड्यांची 26 ते 30 ऑगस्टदरम्यान ताशी 130 वेगाने यशस्वी चाचणी घेण्यात आली.


आगामी काळात 67 गाड्यांचा वाढणार वेग
रेल्वे मंत्रालयाचा विकासाला चालना देण्यावर भर आहे त्यासाठी प्रवासी गाड्या निर्धारीत वेळेवर चालवण्याचे नियोजन असून त्यासोबतच रेल्वे गाड्यांची गती वाढवून त्या माध्यमातून प्रवाशांच्या वेळेची बचत करण्यावरही भर देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वे रूळांची देखभाल केल्यानंतर सहा गाड्यांची ताशी 130 वेगाने चाचणी घेण्यात आली व चाचणी यशस्वी झाल्यानंतर इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात 67 एक्स्प्रेस गाड्यांची वेग वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव महाव्यवस्थापक कार्यालयात पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच गाड्यांची गती वाढणार आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांना भुसावळ, अकोला, ईगतपुरी या स्थानकावर नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे अर्धा तास आधी पोहोचता येणार आहे.
तिसर्या-चौथ्या लाईनचा फायदा
भुसावळ ते मनमाड आता तिसरी लाईन पूर्ण झाली असून या लाईनीवरून मालगाड्या चालविल्या जात आहे. यामुळे मेन लाईनी या मोकळ्या असल्याने प्रवासी गाड्या या मार्गावरून वेगात धावत आहे. पूर्वी पुढे मालगाडी असल्यास प्रवासी गाड्या थांबत असत मात्र आता नवीन लाईनीमुळे मालगाड्या या स्वतंत्र लाईनीवरून धावत असल्याने प्रवासी गाड्या त्यांच्या वेगात व वेळेत पोहोचत असल्याने प्रवाशांचा मनस्ताप कमी झाला आहे.
