रावेर तालुक्यातील सहा गावांना पुराचा वेढा
ऐनूपरातील पुराच्या नुकसानीची रोहिणी खडसे यांच्याकडून पाहणी
Flood surrounds six villages in Raver taluka मुक्ताईनगर : रावेर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तापी व पूर्णा नदी ओसंडून वाहत असून हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर आला आहे. दुसरीक रावेर तालुक्यातील तापी नदी काठच्या नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर गावांचे रस्ते व पुलांवर धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने परीसराला वेढा पडून सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तापी नदीच्या महापूरातील बॅकवॉटरखाली नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर शिवारातील सुमारे 200 हेक्टर शेतजमिनील खरीपाची व बागायती केळी तथा फळबागा बुडाल्याने शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
संततधार पावसाने घरांची पडझड
ऐनपूर, निंबोल, विटवा व इतर गावात पूरसदृश्य परीस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बॅक वॉटर चे पाणी घरांमध्ये व शेती शिवारात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ऐनपूर येथे भेट देत महापुराची पाहणी केली. रोहिणी खडसे यांनी ऐनपूर येथे पुराची पाहणी करून नागरीकांना धीर दिला तसेच रावेर तहसीलदार यांच्या सोबत दुरध्वनीवरुन चर्चा करीत नागरीकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली.

यांची होती पस्थिती
यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, सरपंच अमोल महाजन, किशोर पाटील, अरविंद महाजन, अक्षय महाजन, मोहन कचरे, सलमान खान, हैदर अली यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

