पुण्यासह नशिराबादमधून दुचाकी चोरणार्यास बेड्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चोरीच्या दोन दुचाकी जप्त
भुसावळ : पुण्याच्या सिंहगड कॉलेजसह नशिराबादजवळील गोदावरी रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी लांबवणार्या भुसावळच्या चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीने आणखी काही गुन्हे केल्याची माहिती असून अधिक तपासासाठी त्यास नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विजय ऊर्फ पांड्या निवृत्ती पाचपांडे (रा.अंजाळे, ह.मु.भुसावळ) असे अटकेतील अट्टल आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांना दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक गुट्टे, एएसआय अशोक महाजन, हवालदार रवींद्र पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख, इद्रीस पठाण, वैशाली महाजन, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, अशरफ शेख, युनूस शेख, ॅ महेश पाटील, दर्शन ढाकणे, प्रमोद लाडवंजारी यांना भुसावळ राहणारा विजय पाचपांडे हा चोरीच्या दुचाकी विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास बुधवारी नाहाटा चौफुली परीसरातून अटक करण्यात आली. आरोपीने गोदावरी रुग्णालयाजवळून तसेच पुण्यातील सिंहगड कॉलेज परीसरातून चोरलेली दुचाकी काढून दिली. आरोपीस नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपीने आणखी काही गुन्हे केल्याची दाट शक्यता आहे.