केळी उत्पादकांच्या पीक विम्यासाठी डॉ.विवेक सोनवणे यांचे जलसमाधी आंदोलन
Jalasamadhi movement of Dr. Vivek Sonwane for crop insurance of banana producers मुक्ताईनगर : मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील 77 हजार केळी उत्पादक शेतकर्यांना शासन निर्णयानुसार विमा कालावधी संपल्यानंतरही विम्याची नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन
जळगाव जिल्हा हा केळीसाठी सुप्रसिद्ध जिल्हा असून जळगाव जिल्ह्यातील 81 हजार 642 हेक्टर क्षेत्रासाठी 77 हजार 920 शेतकर्यांनी पिक विमा काढला होता. 18 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी शेतकर्यांना भरपाईची रक्कम कमी व उच्च तापमानाची तीन आठवड्यांच्या आत तसेच चक्रीवादळ, गारपीट, अतिवेगाचे वारे यांची नुकसान भरपाई 45 दिवसांच्या आत एकूण हेक्टर एक लाख 40 हजार पंचनाम्यानुसार नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक होता. विम्याचा कालावधी 31 जुलै रोजी संपुष्टात येऊन दीड महिना उलटूनही दिवस आजतागायत शेतकर्यांना कोणती नुकसान भरपाई मिळालेली नाही. 18 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारंवार करण्यात येत असताना जिल्हा प्रशासनासह विमा कंपनीकडून स्वाभिमानीच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आल्याच्या निषेधार्थ व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी विमा व कंपनीचे तालुका प्रतिनिधी सुभाष पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी किशोर घटे, संभाजी पाटील, संदीप बेलदार, समाधान पांडे, ज्ञानेश्वर वानखेडे, पिंटू खाटीक, चुडामण पाटील, रामकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, भैय्या पाटील, अशोक कोळी, सुरेश पाटील, हेमंत पाटील, मयूर पाटील, रामा पाटील व इतर शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

