शहराच्या प्रगतीसाठी सलोखा, एकोपा गरजेचा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
भुसावळातील संतोषी माता हॉलमध्ये पदाधिकार्यांची बैठक : अधिकार्यांनी जाणल्या समस्या
Reconciliation, unity is needed for the progress of the city : Collector Ayush Prasad भुसावळ : शहराच्या प्रगतीसाठी सलोखा व एकोपा जपणे गरजेचे आहे.गणेशोत्सव काळात कोणत्याही मंडळाच्या पदाधिकार्यांनी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, पोलीस व गुप्तचर यंत्रणेचे प्रत्येक मंडळाच्या पदाधिकार्यांकडे लक्ष असून कुणीही कायदा हातात घेवून शांतता भंग करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे केले. गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
उत्सव शांततेत साजरा करा
शहरातील संतोषी माता सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले की, गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे. गणेशोत्सवात कुणाच्या सांगण्यावरून अशांतता निर्माण करू नका, नाही तर याचे परीणाम तुम्हाला भोगावे लागतील, यासाठी गणेशोत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.एम.राजकुमार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, तालुका निरीक्षक बबन जगताप, शहर निरीक्षक गजानन पडघन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसिंग रावळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रविद्र बाविस्कर यांच्यासह विज कंपनीचे अधिकारी, दुय्यम पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नाना पाटील यांनी केले.
शहरातील खराब रस्त्यांबाबत साकडे
माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयातून होणार्या विलंबाबाबत समस्या मांडली. जिल्हाधिकारी यांनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. शेख सलीम शेख अमीर उर्फ चुडीवाले यांनी ईद ए मिलादची 28 तारखेला निघणारी मिरवणूक शुक्रवारी काढणार असल्याचे सांगितले. तसेच शेख पापा, मुनवर खान, मुकेश गुंजाळ, वरूण इंगळे यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी समस्या मांडल्यात. यात खराब रस्ते, विजेच्या तार खाली लोंबकळणे, बॅरेकेट आदींबाबत समस्या मांडल्यात. पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी पालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
भुसावळ पॅटर्न जिल्ह्यात राबविणार
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.एम.राजकुमार यांनी सांगितले की, भुसावळात विसर्जनाच्या वेळी मशीदीजवळ लावण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे प्रत्येक मंडळाला वेळ मिळत आहे, हाच पॅटर्न पोलीस प्रशासनातर्फे जिल्हाभरात राबविला जाणार आहे. चोपडा येथेही ही पध्दत सुरू करण्यात येत आहे. ज्या शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहतात त्या शहराचा विकास हा झपाट्याने होत असतो. यासाठी आपण कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

