दौंड-मनमाड रेल्वे लाईन दुहेरीकरणाचा फटका : दहा गाड्या रद्द
Daund-Manmad railway line doubling hit : 10 trains cancelled भुसावळ : ऐन सणासुदीत रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर करीत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. दौंड ते मनमाड दरम्यानच्या रेल्वे लाईन दुहेरीकरण कामासाठी अचानक रेल्वेने दहा गाड्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दुहेरीकरण कामामुळे गाड्या रद्द
रेल्वे प्रशासनातर्फे दौंड-काष्टी, बेलवंडी-बेलापूर, पुणतांबा-कान्हेगाव या दरम्यान शनिवार, 24 व रविवार, 25 सप्टेंबर रोजी हे काम केले जात आहे. दौंड-मनमाड हे 2081 कोटी रुपयांचे दुहेरीकरणाचे काम रेल्वेकडून होत असून पहिल्या टप्यात 102 किमी अंतराचे काम पूर्ण झाले तर दुसर्या टप्यात 134 किमी अंतराचे काम पूर्ण केले जात आहे. दौंड-काष्टी, बेलवंडी-बेलापूर, पुणतांबा-कान्हेगाव तसेच अकोळनेर-सारोळा विभागातील 5.77 किमी अंतराचे दुहेरीकरणाचे काम केले जात आहे.
या गाड्या केल्या रद्द
रद्द होणार्या गाड्यामध्ये जबलपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 23 रोजी जबलपूरहून सुटणार नाही, पुणे-जबलपूर ही गाडी पुण्यातून 25 रोजी सुटणार नाही. दादर-शिर्डी ही दादरहून 23 रोजी तर शिर्डी-दादर ही गाडी 24 रोजी, पुणे-निजामाबाद एक्स्प्रेस आणि निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या 30 सप्टेबरपर्यंत रद्द असतील, पुणे-नांदेड ही गाडी 23 व 24 सप्टेंबर रोजी रद्द तर नांदेड-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 24 व 25 रोजी रद्द असेल, राणी-कमलापती-पुणे एक्स्प्रेस ही 23 रोजी पुणे-राणी कमलापती एक्स्प्रेस ही गाडी 24 रद्द असेल. दरम्यान, 12 गाड्यांच्या मार्गातही रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे.
