यावलला लोकशाही दिनात चार तक्रारी प्राप्त
यावल : यावल तहसील कार्यालयामध्ये लोकशाही दिनात तालुक्यातुन चार तक्रारी प्राप्त झाल्या. यात लंपी आजारात दगावलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई पंचानाम्यानंतरही मिळाली नसल्याची तक्रार करण्यात आली. संबंधित प्राप्त तक्रारी त्या-त्या विभागाला पाठवण्यात आल्या असून तक्रारींचे निराकरण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार मनोज खारे यांच्या उपस्थितीत या लोकशाही दिनी चार तक्रारी प्राप्त झाल्या. यात दोन तक्रारी लंपीमुळे दगावलेल्या गुरांच्या नुकसान भरपाई संदर्भात आहेत तसेच एक यावल शहरातील विस्तारित भागात गटारीच्या समस्या संदर्भात तर एक तक्रार दुय्यम निबंधक सहकारी संस्थेच्या संदर्भात आहे. चारही प्राप्त तक्रारींच्या निपटार्याकरीता संबंधित विभागांना पत्र आणि तक्रारी पाठवण्यात आले. पुढील लोकशाही दिनी या संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लोकशाही दिनाच्या दिवशी तक्रारदार विक्रम राजपूत, रमेश पाटील, संतोष पाटील, विजय मराठे एच. एन. तडवी सह आदींची उपस्थिती होती.
