भुसावळातील जीर्ण इमारतींवर पडणार ‘हातोडा’

पालिका अ‍ॅक्शन मोडवर : 80 मालमत्ताधारकांना बजावल्या नोटीसा : कागदपत्रे सादर न केल्यास कारवाई


The ‘hammer’ will fall on dilapidated buildings in Bhusawal. भुसावळ : शहरात 27 जानेवारी रोजी झालेल्या भूकंपानंतर शहरातील पडावू इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता तर काही दिवसांपूर्वीच जळगावात पडावू इमारत कोसळून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू ओढवल्यानंतर पुन्हा पडावू इमारतींचा मुद्दा उपस्थित झाला होता. भुसावळ पालिकेने पडावू इमारती पाडण्याबाबत काही महिन्यांपूर्वी वल्गना केली होती मात्र शहरातील अनेक इमारतींबाबत न्यायालयात दावा दाखल असल्याने कायदेशीर कारवाईला अडचण निर्माण होत होती. पालिकेने या संदर्भात आता शहरातील 80 मालमत्ता धारकांना नोटीसा बजावल्या आहेत. पडावू मालमत्तेबाबत काही भाऊबंदकीचा वाद, भाडेकरू प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असल्यास अशा मालमत्ताधारकांनी 29 सप्टेंबरपर्यंत पालिकेला कागदपत्रांसह सूचित करण्याचे कळवण्यात आले आहे. त्यानंतरही कागदपत्रे न आल्यास वाद नाही हे गृहित धरून या मालमत्ती पाडण्यात येतील, असे मुख्याधिकार्‍यांनी नोटीसीत बजावले आहे. शहरातील सुमारे 80 मालमत्ता धारकांना अशा पद्धत्तीने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

जीर्ण इमारती उठल्या नागरीकांच्या जीवावर
शहरातील जीर्ण इमारती वर्षानुवर्षे उभ्या आहेत. शहरात 27 जानेवारी रोजी झालेल्या भुकंपानंतर पालिकेने 80 जीर्ण व पडावू इमारतींच्या मालकांना नोटीस बजावल्या होत्या मात्र यानंतर एकही जीर्ण इमारत पाडण्यासाठी पालिकेने प्रयत्न केला नसल्याचे दिसून आले होते शिवाय अनेक जीर्ण इमारतींच्या बाहेर धोक्याची सूचना देणारे फलकही गायब झाले आहेत. यामुळे पावसाळ्याच्या काळात इमारत कोसळून मोठी जीवीतहानी होण्याचा भीती व्यक्त होत आहे.

पालिकेच्याच दिव्याखाली अंधार
शहरातील जीर्ण इमारतीची जबाबदारी पालिकेची आहे मात्र शहरातील पालिकेच्याच मालकिची जुनी प्रशासकीय इमारत जीर्ण झाली आहे. गेल्या काळात स्टॅक्चरल ऑडीटमध्ये धोकेदायक ठरलेली ही इमारत अद्यापही उभी आहे. यासोबतच शहरातील विविध भागांमध्ये जीर्ण इमारतींचा प्रश्न कायम आहे. शहरात 27 जानेवारी झालेल्या भूकंपानंतर पालिकेने शहरातील 80 जीर्ण इमारत धारकांना नोटीस बजावली होती मात्र यानंतरही जीर्ण इमारती उभ्याच आहेत. संबंधीत इमारतीच्या मालकांसोबत चर्चा करुन धोकेदायक असलेल्या या इमारती नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार होते मात्र पालिकेकडून गेल्या काळात हे प्रयत्नही झाले नाहीत. खुद्द पालिकेच्या जुन्या प्रशासकिय इमारतही अद्याप उभी आहे. या इमारतीमधील दर्शनी भागातील दुकाने सुरू असल्याने या ठिकाणी धोका अधिक आहे मात्र याकडे नेहमीप्रमाणे दूर्लक्ष केले जात आहे. आगामी काळात काही दूर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.

या भागात जीर्ण इमारती
शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड, राम मंदिर वॉर्ड, जाम मोहल्ला, सराफ बाजार, न्यू एरिया वॉर्ड, शनी मंदिर वॉर्ड, कुलकर्णी प्लॉट, म्युन्ीसीपल पार्क परीसर, गंगाराम प्लॉट भाग, जूना सतारे, ओंकारेश्वर मंदिर परिसर आदी भागात जीर्ण इमारती आहेत. काही इमारतींमध्ये नागरीकांचे वास्तव्यदेखील आहे. मुळ घर मालक व भाडेकरु तसेच भाऊंबदकीचे वाद असल्याने न्यायालयीन वादविवाद सुरू आहेत. यामुळे पालिकेलाही कारवाईसाठी अडचणी येत आहेत.

पालिका अ‍ॅक्शन मोडवर : बजावल्या नोटीसा
जीर्ण इमारतींचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असल्याने पालिकेने आता शहरातील 80 मालमत्ताधारकांना नोटीसा बजावल्या आहेत. संबंधित मालमत्ता धारकांनी भाऊबंदकीसोबत काही वाद असल्यास तसेच भाडेकरूसोबत कोर्टात काही दावा दाखल असल्यास त्याबाबतची कागदपत्रे 29 सप्टेंबरपर्यंत पालिकेत सादर करण्याचे नोटीसी अन्वये कळवण्यात आले आहे. त्यानंतर कागदपत्रे सादर न झाल्यास कुठलाही वाद नाही म्हणून पालिका या इमारती जमीनदोस्त करेल व त्यासाठी होणारा खर्च संबंधितांकडून वसुल करेल, असे नोटीसीत प्रशासक जितेंद्र पाटील व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी बजावले आहे शिवाय पडावू इमारतीच्या मालकांना इमारती पाडण्याचे नोटीस अन्वये बजावण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !