भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांड : आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
Bhusawal city double murder case : Sessions court rejects the bail application of the accused भुसावळ : शहरातील शकुन इस्टेट भागात 23 मे रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. 23 मे रोजी पहाटे आरोपी हेमंत भूषण याने घरात झोपलेल्या पत्नी आराध्या भुषण व आई सुशिलाबाई भुषण यांच्यावर फ्रायपॅन व लोखंडी सळईने हल्ला करून जीवे ठार मारले. या प्रकरणात त्यांचा शालक ऋषभ हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम 302 व कलम 307 नुसार गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी हेमंत भूषण याने अॅड. सत्यनारायण आर.पाल यांचे मार्फत भुसावळ येथील सत्र न्यायालयात जामीन करीता अर्ज दाखल केला होता. यावर सत्र न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाली.
आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग
खटल्यात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर जामीन अर्ज दाखल करण्यात आला. आरोपी हा रेल्वेत सरकारी नोकर असल्याने कामावरून विनापरवाना ब्रेक शु-पीन व लोखंडी तवा आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. हल्ल्यात शालक ऋषभ गंभीर जखमी झाला होता. प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने व आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील प्रवीण पी.भोंबे यांनी केला.






आरोपीची मयत पत्नी आराध्य हिचा भाऊ विनोदकुमार यांनी जामीनावर हरकत घेणे करीता अॅड.योगेश दलाल यांचे मार्फत जामीन फेटाळण्याकरीता लेखी युक्तीवाद दाखल केला. आरोपीला जामीन मिळावा या करीता आरोपीचे वकील यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे सहा न्याय निवाडे दाखल केले. हे करण अतिशय गंभीर असून यात दोन खुन झाल्याचे दिसून येत असल्याने सत्र न्या.आर.एम.जाधव यांनी सदरचा जामीन अर्ज फेटाळला. फिर्यादीतर्फे अॅड. योगेश दलाल तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रवीण पी.भोंबे तर आरोपीतर्फे अॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी काम पाहिले.


