मुसळधार पावसात वीज कोसळल्याने सुसरीतील दोन्ही विवाहिता ठार

मुसळधार पावसापासून बचावासाठी लिंबाच्या आडोशाला थांबणे बेतले जीवावर : सुसरी गावात शोककळा


Both married women in Susari were killed due to lightning strike during heavy rain भुसावळ : कपाशी पिकात निंदणी सुरू असताना अचानक वातावरणात बदल होवून पावसाला सुरूवात झाल्यानंतर निंबाच्या झाडाच्या आडोशाला थांबलेल्या दोघा विवाहितांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारात मंगळवारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने वरणगाव परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. ममता विनोद पाटील (33) व मीनाक्षी रवींद्र तळेले (29, दोन्ही रा.सुसरी, ता.भुसावळ) अशी मयत विवाहितांची नावे आहेत.

झाडावर वीज कोसळताच विवाहितांचा मृत्यू
तुकाराम शामराव तळेले यांच्या स्वमालकीचे शेत गट नंबर 443 हे रवींद्र तळेले यांनी नफ्याने घेतले आहे. शेतात कपाशीची लागवड करण्यात आली असून मंगळवारी सकाळपासून निंदणी कामासाठी ममता व मीनाक्षी या सुसरीतील विवाहिता काम करीत असताना दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास वातावरणात बदल झाल्यानंतर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी दोन्ही विवाहिता निंबाच्या झाडाला आश्रयाला थांबल्या मात्र त्याचवेळी झाडावर वीज कोसळताच दोघा विवाहितांचाही मृत्यू झाला.

सुसरी गावात शोककळा
शेतकरी रवींद्र तळेले यांनी लागलीच ही बाब गावात कळवल्यानंतर दोघांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकिय अधिकारी डॉ.क्षितीजा हेडवे यांनी त्यांना मृत घोषीत केले. पोलीस पाटील नितीन पुंडलिक पाटील (सुसरी) यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर पाटील, हवलदार मनोहर पाटील, नागेंद्र तायडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !