शास्त्रोक्त पद्धतीने केळी व्यवस्थापन न केल्यास केळीचे भवितव्य धोक्यात
डॉ.के.बी पाटील : केळी परीसंवादाला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
If banana is not managed scientifically, the future of banana is in danger फैजपूर : केळी पीक आणि केळी व्यवसाय हा जळगाव जिल्ह्याचा आणि त्यातही विशेषतः रावेर यावल तालुक्यांचा मुख्य कणा आहे परंतु केळीवर येणारे विविध रोग बंची टॉप, सी.एम.व्ही, करपा, सिगा टोका लक्षात घेता आता शास्त्रोक्त पद्धतीने केळीचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. अन्यथा काळाच्या ओघात केळी पीक नष्ट होऊ शकते, असा धोक्याचा इशारा देत शेतकर्याने आता जागे होण्याची आवश्यकता आहे, असे मत जैन इरीगेशनचे उपाध्यक्ष आणि केळीतज्ज्ञ डॉ.के.बी पाटील यांनी शहरात आयोजित केळी परीसंवादात मंगळवारी व्यक्त केले.
फैजपूरात केळी परीसंवाद
शेतकर्यांच्या विकासासाठी आयुष्य समर्पित केलेल्या माजी आमदार खासदार कृषिमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या 70 व्या जयंती निमित्ताने फैजपूर येथील सुमंगल लॉन्समध्ये केळी उत्पादक आणि केळी निर्यातीसाठी इच्छुक उद्योन्मुख उद्योजकांसाठी केळी परीसंवादाचे हरिभाऊ मित्र परीवारातर्फे आयोजन करण्यात आले. उद्घाटन दीपप्रज्वालन करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व केळी पीक तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील, शेतकरी प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. स्व.हरिभाऊ जावळे यांच्या तैलचित्राचे विधीवत पूजन करण्यात आले.

अमोल जावळे शेतकर्यांच्या प्रश्नी संवेदनशील
केळीतज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील म्हणाले की, स्व.हरीभाऊ जावळे यांच्याप्रमाणेच अमोल जावळेदेखील शेतकर्यांच्या प्रश्ना संदर्भात संवेदनशील आहेत. ते ायमच शेती, माती आणि पाण्याच्या प्रश्नावर काम करीत आहेत. हे पाहुन आम्हा सर्वांना स्व.हरिभाऊची प्रकर्षाने आठवण येते. यावेळी त्यांनी केळीचे अन्नद्रव्य आणि करपा, पिटिंग व सीएमव्ही रोगाचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली.
शेतकरी समृद्धीसाठी स्व.हरिभाऊंचे प्रयत्न
प्रास्ताविक करताना अमोल जावळे म्हणाले की, स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी आपल्या भागातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी केळी संबंधित जे-जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केळी करपा निर्मूलनाचे अनुदान प्राप्त करून घेतले. हरिभाऊ जावळे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे आहे.
अर्थव्यवस्था गतिमान करण्याची गरज
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, केळी उत्पादनासाठी रावेर आणि यावल हा परीसर देशात प्रसिद्ध आहे आणि या पिकासंदर्भात माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी जे प्रयत्न आणि योगदान दिले आहेत ते खूप कौतुकास्पद आहे. मार्केटमधील आपली स्पर्धा ही केवळ राज्य आणि देशापुरता मर्यादित नाही तर आपल्याला संपूर्ण जगाचा विचार करावा लागेल. कृषीसह विविध औद्योगिक क्षेत्राला आपण कसे विकसित करू शकतो याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आपली अर्थव्यवस्था आपल्याला आणखी गतिमान करण्याची गरज आहे. या परिसंवादातून जो काही अहवाल तयार होईल त्याला जिल्हा नियोजन मधे मांडून त्यावर काम करता येईल.
तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धत्तीने केलेली शेती फायद्याची
सोलापूर येथील प्रगतशील शेतकरी किरण डोके म्हणाल ेकी शेती ही फायद्याची आहे. फक्त ती तांत्रिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केली तर फायद्याची ठरू शकते हा माझा स्वतःचा अनुभव आहे. शेती करावी पण ती क्वालिटीची करावी आणि आपण पिकवलेला माल हा एक्सपोर्ट कसा होईल याचा विचार करून शेतीचे नियोजन करावे. आपल्याला स्व-मालकीचे कोल्ड स्टोरेज निर्माण करता आले पाहिजे. हणजे आपण आपला शेत माल पाहिजे तसा स्टोरेज करू शकतो आणि त्यातून आपल्याला बाजारपेठेतील बदलणारे भाव कॅश करता येतील. रावेर-यावल तालुक्यातील जमीन ही केळीसाठी पोषक आहेच. शेतकरीही मेहनती आहे फक्त निर्यात क्षम दर्जाची केळी उत्पादन यावर भर देण्याची गरज आहे. कृउबाची माजी सभापती हिरालाल चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे, फैजपूर उपविभागीय प्रांताधिकारी कैलास कडलग, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे, फैजपूर सहा.पोलिस निरीक्षक निलेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन यांनी तर आभार यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील यांनी मानले. या परिसंवादला रावेर, यावल, मुक्ताईनगर बोदवड, भुसावळ, चोपडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे करण्यात आले. यावेळी अमोल जावळे यांच्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पक्ष प्रतिनिधी व्यासपीठासमोर शेतकर्यांसोबतच बसलेले होते. स्व.हरीभाऊ जावळे यांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

