रावेरात केळी पीक विम्याच्या लाभासाठी महामार्गावर शेतकर्यांचा ‘रास्ता रोको’
तासभर बर्हाणपूर महामार्ग रोखला : शेतकरी आक्रमक
Farmers ‘stop the road’ on the highway for benefit of banana crop insurance in Raver रावेर : हवामानावर आधारीत केळी फळ पीक विम्याची व सीएमव्हीने बाधीत झालेल्या क्षेत्राची रक्कम त्वरीत या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे मंगळवारी रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. सुमारे तासभर बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग आंदोलकांनी रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली.
महामार्गावर लागल्या वाहनांच्या
रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात जि.प..चे माजी सदस्य रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. केळी पीक विम्याची तसेच सीएमव्ही रक्कम त्वरीत मिळावी तसेच सीएमव्हीचा पीक विमा योजनेत सामावेश करा इत्यादी मागण्यासाठी रावेरात शेतकरी आक्रमक झाले. शेतकर्यांनी सुमारे एक तास अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्ग रोखून धरल्याने महामार्गावर प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या. केळी फळ पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, कोण म्हणते देत नाही नुकसान भरपाई घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा जोरदार घोषणाबाजीने परीसर दणाणला.

आंदोलनात यांचा होता सहभाग
यावेळी आमदार शिरीष चौधरी, जिल्हप परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, प्रहार जनशक्ती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, कृषी उपन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, बाजार समिती संचालक पांडुरंग पाटील, जयेश कुयटे, गणेश महाजन, डॉ.राजेंद्र पाटील, योगीराज पाटील, माजी सभापती नीळकंठ चौधरी, तालुका अॅग्रो डीलर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष प्रवीण पंडीत, सुरेश पाटील, जिजाबराव पाटील, सुरेश शिंदे, योगेश पाटील, संतोष पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, विनोद पाटील, युवराज महाजन, राहुल महाजन, निलेश पाटील, दीपक पाटील, राहुल महाजन, गणेश चौधरी, डी.डी.वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
सभापती सचिन पाटील उपोषण करणार
अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर शेतकर्यांनी आंदोलन मागे घेत विमा कंपनीला आठ दिवसांची मुदत दिली. आठ दिवसांच्या मुदतीत शेतकर्यांना केळी विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही तर येत्या सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यानंतर शेतकर्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्यासह शासकीय, अधिकारी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावक, फौजदार राजेंद्र करोडपती आणि सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

