भुसावळ-पुणे स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची मागणी
मनसेकडून भुसावळ रेल्वे प्रबंधकांना निवेदन
यावल : रेल्वे प्रवाशांकरीता भुसावळ ते पुणे स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रबंधक, भुसावळ यांच्याकडे मनसेद्वारे निवेदनाद्वारे करण्यात आली. तत्काळ याबाबत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वात भुसावळ डीआरएम ईती पांडे यांना निवेदन देण्यात आले.
मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन
यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ ते पुणे येथे स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची मागणी आहे. भुसावळ, रावेर, सावदा, यावल, जामनेर, जळगावसह जिल्ह्यातून पुण्याला जाणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर रेल्वे गाड्या उपलब्ध असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. यामुळे खाजगी वाहतूकदाराच्या मनमानीपणामुळे प्रवासी हतबल झाले आहे. विशेष करून सणासुदीचा काळामध्ये लक्झरी बस मालक हे अव्वाच्या सव्वा दर आकारणी करत असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसतो. यामुळे या मार्गावर एक्सप्रेस ट्रेन सुरू करावी, अशी मागणी आहे.
भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी गोर-गरीबांसाठी उपयुक्त असली तरी अनेकदा ही चालू-बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांची कुचंबणा होते तसेच ही रेल्वे गाडी कल्याण-पनवेल मार्गाने पुण्याला जात असल्याने मनमाड-दौंड मार्गाने पुण्याला जाणार्यांसाठी हुतात्मा एक्सप्रेस सोयीची नाही. या सर्व बाबींचा विचार करता दिवसातून दोनदा आणि हे शक्य नसेल तर किमान एक वेळेस भुसावळ ते पुणे आणि पुणे ते भुसावळ एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देतेप्रसंगी मनसे जनहित कक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चेतन दिलीप अढळकर, मनसे यावल तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, यावल शहर उपाध्यक्ष कुणाल बारी, भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, शाम पवार सह आदींची उपस्थिती होती.
