भुसावळ पालिकेची सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिम

शहरातील वर्दळीचे रस्ते घेणार मोकळा श्वास ; पालिकेचा सोमवारपर्यंत अल्टीमेटम ; रस्त्यावरील 50 फलक पालिकेने जप्त


Bhusawal Municipality’s encroachment removal campaign from Monday भुसावळ : भुसावळ शहरातील सर्वच वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. शुक्रवार, 6 ऑक्टोंबर रोजी पालिकेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांच्या नेतृत्वात यावल रोड, कोर्ट परीसर, जुना सातारा भागातील व्यावसायीकांनी रस्त्यावर ठेवलेले सुमारे 50 हून अधिक फलक पथकाने जप्त केले तर अतिक्रमण केलेल्या व्यावसायीकांना सोमवारपर्यंत अतिक्रमण हटवण्याबाबत तोंडी निर्देश देण्यात आले व त्यानंतरही अतिक्रमण न हटल्यास सोमवारनंतर पालिकेतर्फे मोहिम राबवण्याचा इशारा देण्यात आल्याने अतिक्रमण करणार्‍यांच्या गोटात प्रचंड भीती पसरली आहे. कारवाईच्या धास्तीने आतापासून टपरी धारकांनी टपर्‍या हलवण्यास सुरूवात केली आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये निघाले होते अतिक्रमण
पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर व तत्कालीन नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांच्या काळात 28 जानेवारी 2016 रोजी मोहिम राबवून तीन दिवस अतिक्रमण हटवण्यात आले होते तर तत्कालीन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या नेतृत्वात गुरुवार, 24 फेबु्रवारी ते शुक्रवार, 25 फेबु्रवारी 2022 व सोमवार, 27 फेब्रुवारी 2022 दरम्यान तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहिम राबवून रस्ते मोकळे करण्यात आले होते. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला मात्र पालिकेची मोहिम आटोपताच टपरी धारकांनी पुन्हा टपर्‍या थाटल्याने ‘जैसे थे’ स्थिती उद्भवली होती.



यावल-जळगाव रोडवर सर्वाधिक अतिक्रमण
भुसावळ शहरातील सर्वच रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत. कुणीही या अन पालिकेच्या रस्त्यावर टपरी थाटा, असा प्रकार शहरात सुरू आहे मात्र या प्रकारामुळे शहराच्या नावलौकीकाला बाधा पोहोचत आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर थाटण्यात आलेल्या टपर्‍यांमुळे रस्ते दिवसागणिक अरूंद होवून अपघाताचे प्रमाण वाढत आहे. शहरातील यावल रोड तसेच जळगाव रोडवर तर सर्वाधिक टपर्‍या व दुकाने थाटण्यात आल्या आहेत. पालिकेकडून कारवाईबाबत चालढकल होत असल्याने व्यावसायीकांनी पक्के अतिक्रमण करून ठेवले आहे. या शिवाय आरपीडी रोड, जाम मोहल्ला, खडका रोड, जामनेर रोड, न्यायालयामागील भागात अतिक्रमण वाढले आहे. विशेष म्हणजे व्यावसायीकांनी फुटपाथही सोडलेला नाही तर मोठ-मोठे बॅनर्स तसेच वेदर शेड बनवल्याने पादचार्‍यांना धड पायी चालता येत नाही, असे चित्र शहरात आहे.

50 फलक जप्त : सोमवारपर्यंतचा अल्टीमेटम
शुक्रवारी सकाळी पालिकेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांच्यासह ओएस परवेज शेख, आस्थापना प्रमुख वैभव पवार, वसुली विभागाचे अनिल मनवाडे, चंदू येवले, सचिन नारखेडे, अनिल भाकरे, विकास महाजन आदींच्या पथकाने यावल रोड, न्यायालयाचा पुढील व मागील बाजूचा परीसर तसेच तार ऑफिसरोडवरील अतिक्रमण करणार्‍यांना अतिक्रमण सोमवारपर्यंत हटवण्याच्या सूचना केल्या तसेच रस्त्यावर बेकायदेशीररीत्या आणून ठेवलेले सुमारे 50 फलक जप्त केले.

बड्या अतिक्रमणांवर कारवाई कधी ?
शहर विद्रुपीकरण व वाहतूक कोंडीच्या नावाखाली झालेले अतिक्रमण पालिका काढणार असलेतरी शहरात मोठ्या प्रमाणावर घरांसह ईमारतींचे मजले तसेच व्यापारी संकुलांमध्ये अनधिकृतरीत्या बांधकाम करण्यात आल्याने हे अतिक्रमण पालिका कधी हटवणार आहे? असा प्रश्न सुज्ञ जनता उपस्थित करीत आहेत. शहरात हॉकर्स झोन तसेच राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही तसेच अनेक व्यापारी संकुलातील गाळे विक्रीचा तिढा सुटलेला नाही हा प्रश्न सुटल्यास बेरोजगारांना रस्त्यांवर टपर्‍या टाकण्याची गरज राहणार नाही, असा सूरही उमटत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !