कर्जासाठी बनावट सातबारा आणि गहाणखताद्वारे फैजपूरातील सातपुडा सोसायटीची फसवणूक : दोघांविरुद्ध गुन्हा
Cheating of Satpura Society in Faizpur by fake Satbara and mortgage for loan : Crime against both यावल : फैजपूर शहरातील सातपुडा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वाहन व मशिनरी खरेदीसाठी कर्ज घेतांना खोटा सातबारा आणि खोटे गहाणखत सादर करून फसवणूक करण्यात आली. संस्थेकडून तीन लाख 90 हजार रुपयांचे कर्ज लाटण्यात आल्याने कर्जदार आणि संमतीदार अशा दोघांविरुद्ध यावल न्यायालयाच्या आदेशान्वये फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
फैजपूर शहरातील सातपुडा अर्बन को.ऑफ सोसायटी फैजपूरचे व्यवस्थापक काशिनाथ डोंगर वारके यांनी यावल न्यायालयात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या सोसायटीतून पद्माबाई अमृत पाटील (70) या कर्जदार व सुभाष अमृत पाटील (65, मोहाडी, ता.जामनेर) या संमतीदारांनी वाहन व मशिनरी खरेदीसाठी संस्थेकडून तीन लाख 90 हजार 475 रुपयाचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी मोहाडी येथील शेत गट क्रमांक 116/1/1 या क्षेत्राचा खोटा सातबारा तसेच जामनेर येथील दुय्यम निबंधकाकडील खोटे गहाणखत सादर केले आणि कर्ज घेत बँकेची फसवणूक केली.


न्यायालयाच्या आदेशान्वये फैजपूर पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील करीत आहे.
