वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने
मंत्री गिरीष महाजनांकडे तक्रार : बैठक घेण्याची जिल्हाधिकार्यांना सूचना
Varangaon water supply scheme work at slow pace भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पुन्हा संथ गतीने सुरू असल्याने वरणगाव शहरवासीयांना 15 दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. संथ कामाची गती न वाढल्यास पाणी उन्हाळ्यात परीस्थिती बिकट होवून महिनाभरानंतर पाणी मिळेल व परीणामी मोर्चे, आंदोलने केली जातील त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी लक्ष घालावे व पाणी योजनेचे काम बंद न होऊ देता तातडीने लक्ष घालावे तसेच संथगतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली. दरम्यान, तक्रारीची दखल घेत मंत्री महाजन यांनी जिल्हाधिकार्यांना आढावा बैठक घेण्याच्या सूचना दिल्या.
मंत्र्यांकडे केली योजनेची तक्रार
वरणगाव शहरातील प्रतिभा नगर व विकास कॉलनीतील मंजूर टाकीच्या कामाला सुरुवात झालेली नाही, शहरातील पाईप लाईनचे काम सुद्धा अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने उर्वरीत टाक्यांचे बांधकाम सुद्धा अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जॅकवेलच्या कामाला अद्यापपर्यंत सुरूवात झाली नसल्याने गतीने कामे सुरू करावीत, शहरातील सांडपाणी प्रकल्प नव्याने व भूमिगत गटार प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपरीषदेने तातडीने तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, अशा प्रकारची मागणीवजा तक्रार राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन व निवेदन देवून करण्यात आली.


