जाती-पाती नष्ट करुन भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी एकत्र येणे आवश्यक

रमेश पांडव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मंगळवारी विजया दशमी उत्सव


भुसावळ : भारताला विश्वगुरु बनवायचे आहेत. जाती-पाती नष्ट करायला पाहिजे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. संघटन का करावे ? हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगतात तर कसे करावे हे डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांचा राष्ट्रीय संघ सांगतो. यामुळे सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामिण विकास व संशोधन संस्थेचे संचालक रमेश पांडव यांनी येथे केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मंगळवार, 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवात भुसावळ हायस्कूल मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
महाराष्ट्र राज्य श्री संत रविदास पुरस्कार विजेते डॉ.संजय भटकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ.विरेंद्र झांबरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना रमेश पांडव म्हणाले की, भारतातील जाती व्यवस्था नवीन काळानुसार चुकीच्या आहेत. यापूर्वीदेखील जाती व्यवस्था नव्हती ती व्यवसायावर अवलंबून होती. संघ सात हजार जातींना घेवून सोबत चालतो. संघात कधीही जात विचारली जात नाही. भारतीय म्हणून भारतासाठी काम करतो तो स्वयंसेवक अशी रचना आहे. जाती व वर्ण व्यवस्था नाहिसे करण्यासाठी संघाचे सर्वांत मोठे योगदान आहे. संविधानामध्येही जाती-पातीचा उल्लेख नाही. हिंदू कोड बिलनुसार कार्य चालते. देशाला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असून देश उन्नत राष्ट्र म्हणून उदयास येईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी कार्यवाह प्रसाद पांडे, आमदार संजय सावकारे, मनोज बियाणी, युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, ड. बोधराज चौधरी, अजय भोळे,परिक्षीत बर्‍हाटे आदींसह भाजपचे पदाधिकारी, राष्ट्रसेवा समितीच्या सेविका तसेच आयएमचे डॉक्टर सदस्य उपस्थित होते.

या मार्गाने पथसंचलन
अहिल्यादेवी कन्या विद्यालयात प्रार्थनेनंतर पथसंचलनाला सुरवात झाली. जामनेररोड, गंगाराम प्लॉट, शनिमंदिर वॉर्ड, अप्सरा चौक, मरीमाता मंदिर, लक्ष्मी चौक, सराफ बाजार, भजेगल्ली, जाम मोहल्ला मशीद, डॉ.आंबेडकर पुतळा, मॉडर्न रोड, राममंदिर वॉर्ड, विठ्ठल मंदिर वॉर्ड, बाजारपेठ पोलिस ठाणे, गरुड प्लॉट, म्युनिसीपल पार्क, जळगावरोड, भुसावळ हायस्कूल येथे समारोप झाला.

अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी
अहिल्यादेवी कन्या विद्यालयापासून पथसंचलनाला सुरवात झाली. पथसंचलनावर मुख्य बाजारपेठेतील लक्ष्मी चौक, विठ्ठल मंदिर वॉर्ड, राम मंदिर वॉर्ड आदी ठिकाणी नागरीकांनी स्वयंपूर्तीने पुष्पवृष्टी केली. जाम मोहल्ल्यात श्री राधाकृष्ण प्रभात फेरीच्या सदस्यांनी पुष्पवृष्टी केली. पथसंचलनात 382 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. तर समारोपावेळी तब्बल 600 स्वयंसेवक, नागरीक उपस्थित होते.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !