दसर्याच्या मुहूर्तावर कुर्हेपानाचे येथे उपबाजार समितीचे उद्घाटन
शेतकर्यांना मोठा दिलासा : आमदार संजय सावकारेंच्या हस्ते उद्घाटन,
Inauguration of Upbazaar Committee at Kurhepanache on the occasion of Dussehra भुसावळ : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीने कुर्हेपानाचे येथे दसर्याच्या मुहूर्तापासून उपबाजार समिती सुरू केली आहे. 1960 मध्ये स्थापन झालेल्या बाजार समितीने तब्बल 63 वर्षानंतर प्रथमच उपबाजार समितीची सेवा दिली आहे. आमदार संजय सावकारेंच्या हस्ते मंगळवारी कुर्हे-नशिराबाद रोडवर उपबाजार समितीचे उद्घाटन करण्यात आले. भुसावळ मुख्य बाजार समिती टिंबर मार्केटमध्ये आहे. आवारात शेतीमाल आणण्यासाठी होणार्या खर्चात व वेळेत बचत होणार आहे. यासोबतच खेडा खरेदी, उशिरा पेमेंट, चुकीचे मोजमाप, स्पर्धात्मक लिलाव पध्दती तसेच सरकारी योजनांच्या लाभ न मिळणे यांच्यापासून शेतकर्यांची सुटका होणार आहे.
संचालक मंडळ शेतकर्यांसोबत : आमदार
काटापूजन भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते झाले. यावेळी शेतकर्यांच्या कामाच्या वेळा वगळुनच शेतीमांलाचे लिलाव करावे, अशी सुचना आमदार सावकारे यांनी केली. सकाळी साडेनऊ आणि सायंकाळी साडेचार वाजता लिलाव होणार आहेत. शेतकर्यांना होणार्या फायद्यासाठी हा निर्णय किती मोठा असल्याचे सांगत त्यानंतर सभापती, उपसभापती व संचालक मंडळासोबत असल्याचे सांगीतले. स्व.शांतीलल सुराणा यांच्या स्मरणार्थ या जागेवर खाजगी व्यवसायाची जागा सुराणा परीवाराने निस्वार्थ सर्वांसाठी खुली केल्याने विशेष आभार मानण्यात आले. 1960 साली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. मात्र प्रथमच उपबाजार समितीची सेवा सुरू झाली आहे. शेतकर्यांच्या मुख्य बाजार समितीत येण्यासाठी अडीअडचणी व विविध जाचामुळे शेतीमाल विक्री करीता टाळाटाळ होत असे आता मात्र उपबाजार समितीमुळे फायदा होणार आहे. सूत्रसंचालन संचालक कैलास महाजन यांनी केले.

मुहूर्ताच्या ज्वारीला 2900 रुपये भाव
बाजार समितीत काटा पूजनानंतर खडक्यातील शेतकरी प्रमोद भोळे यांच्या शेतीमाल ज्वारीला लिलावात 2900 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत राहिल, अशी अपेक्षा यावेळी सभापती अनिल वारके यांनी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
सभापती अनिल वारके, उपसभापती शिवाजी पाटील, भुसावळ शहर तथा ग्रामीण भागातील व्यापारी, सर्व संचालक मंडळ, परीसरातील शेतकरी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, विविध कार्यकारी सोसायट्यांचे सदस्य, भुसावळ बाजार समितीचे सचिव नितीन पाटील आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.









