भुसावळातील 37 मंडळांनी दिला दुर्गा मातेला निरोप

मिरवणुकीत 10 वाजता वाद्य बंद : पोलिसांचा बंदोबस्त चोख


भुसावळ : गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात गुरूवारी दुर्गा मातेला साश्रूपूर्ण नयनांनी भाविकांनी निरोप दिला. शहरातील विसर्जनाच्या मिरवणुकीत 37 दुर्गाोत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला. विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी सहा वाजता सुरूवात झाली. रात्री 10 वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आल्याने 10 वाजता विसर्जन मिरवणूकीत असलेल्या मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी वाद्य बंद केली.

शहरातील नृसिंह मंदीरापासून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. येथे शहरातील गंगाराम प्लॉट भागातील नवदुर्गा मंडळाची मिरवणूक संध्याकाळी पाच वाजता आली होती मूर्तीची पालिका व पोलिस प्रशासनातर्फे पूजा, आरती करण्यात येऊन या मंडळाच्या वाहनाला पहिला क्रमांक देण्यात आला. या मंडळानंतर मात्र सहा वाजेनंतर दुर्गा मंडळे नृसिंह मंदीराजवळ येऊ लागली. शहरातील बहूतांश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पाच वाजेनंतरच विसर्जन मिरवणुकीला सुरूवात केली. त्यामुळे जवाहर डेअरी, अप्सरा चौक भागात संध्याकाळी सात वाजेनंतरच दुर्गा मंडळे येऊ लागली होती. यंदा 37 मंडळांचा मिरवणुकीत सहभाग होता. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. विसर्जन मिरवणूकीत पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक निरीक्षक हरीष भोये, अनिल मोरे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात होता. मशीदीला ताडपत्रीने झाकण्यात आली होती.

नदीवर लाईटासह बोटीची व्यवस्था
दुर्गा विसर्जन तापी नदीवर केले जात असल्याने पालिकेच्या माध्यमातून तेथ फोकस लावण्यात आले होते. तसाच नदीवर आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती केली होती. पोलिस प्रशासनातर्फे एक बोटही पाण्यात ठेवली होती, इमजर्न्सी काम पडल्यास बोटीचा उपयोग केला जावा यासाठी ही बोट ठेवली होती. शहरात विविध भागात सुध्दा पालिकेतर्फे फोकस लावण्यात आले होते. क्रेनचीही व्यवस्था केली होती.

एका गाण्यासाठी लाल सिग्नल
मोठ्या मशीदीजवळ पोलिसांतर्फे सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत केली होती. मशीदीसमोरील चौकात दुर्गा मंडळ आल्यावर तेथे एक गाणे अथवा आरती म्हटली जाते, ते झाल्यावर लगेच हिरवा सिग्नल झाल्यावर त्या मंडळाला पुढे जाण्याच्या सूचना केल्या जातात. भुसावळ येथील हा सिग्नल पॅटर्न पोलिसांतर्फे जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे.

काही मंडळे गेली थेट नदीवर
शहरात दुपारपासूनच ज्या मंडळांना मिरवणूकीत सहभाग घ्याचया नसतो त्यांनी त्याच्या मंडळाच्या दुर्गा देवीच्या मुर्ती विसर्जन करण्यासांठी थेट नदीवर घेऊन जातात. काही मंडळातर्फे त्यांच्या मोठ्या मुर्ती या थेट वाघूर धरणावर तसेच हतनूर धरणावर घेऊन गेले. तेथे असलेल्या नदी पात्रातील पाण्यात मुर्तीचे विसर्जन केले.

19 ठिकाणी लावले बॅरेकेट
मुख्य मिरवणूक मार्गावर नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्स पर्यतच्या मार्गाला जाडणारे 19 उपरस्ते विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभुमीवर बॅरेकेट लावून बंद केले होते. त्यात नृसिंग मंदीराकडून तेली मंगल कार्यालयाकडे जाणारा, टोपनदास यांच्या दुकानाजवळील रस्ता, शाळा क्रमांक पाच कडे जाणारा रस्ता, भास्कर मार्केट, शनि मंदीर वॉर्डाला जोडणारे तीन मार्ग, अप्सरा चौकातून विठ्ठल मंदीर वॉर्डाला जोडणारा मार्ग, गणेश मॉलपासून शनि मंदीर वॉर्डला जोडणारा वखार मार्ग, मरिमाता मंदीराच्या बाजूचा, व्हीएम वॉर्डाला जोडणारा रस्ता, जामा मशीद लक्ष्मी चौकातून राम मंदिर वॉर्ड व खाल्लमा दर्गा भागाला जोडणार्‍या दोन्ही उपरस्ते, सराफ बाजारातून ओसवाल पंचायती वाडा, भजे गल्लीला जोडणार रस्ता, मॉडर्न रोडपासून चिरा गल्लीला जोडणारा रस्ता, जनता टॉवर पासून इस्कॉन मुरलीधर मंदिराला जोडणारा रस्ता सुध्दा प्रशासनाकडून बॅरेकेट लावून बंद केले होते.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !