भुसावळात पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये अडीच लाखांचा गांजा पकडला
Ganja worth two and a half lakh seized in Puri-Gandhidham Express at Bhusawal भुसावळ : 20803 अप पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून सतर्क रेल्वे सुरक्षा बलाने सुमारे अडीच लाखाहून अधिक किंमतीचा गांजा पकडल्याने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
डॉग स्कॉडला संशय अन गांजा जप्त
रेल्वे गाड्यांमधील अप्रिय घटना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या डॉग स्कॉडतर्फे सातत्याने गाड्यांची तपासणी केली जात आहे. अकोला येथे गेलेले डॉग स्कॉड पथक 20803 अप पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून भुसावळकडे येत असताना एक्स्प्रेसच्या एस- 9 बोगीतील शौचालयात डॉगला काहीतरी संदिग्ध वस्तू असल्याचा संशय आल्यानंतर त्याने पथकाला सिग्नल दिला. पथकाने तातडीने तपासणी केली असता शौचालयात बेवारस अवस्थेत गांजा पॅक केलेला दिसून आला तर संशयित मात्र कारवाईची शक्यता लक्षात घेता अंडर ग्राऊंड झाल्याचा संशय आहे.


यावेळी पथकाने अंदाजे 40 किलो गांजा खाली उतरवत स्थानिक तहसील प्रशासनाला अधिक कारवाईसाठी पाचारणा केले. भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.के.मीना यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.